अहमदनगर - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शनिशिंगणापूर देवस्थानने 13 मार्च रोजी साजरा होणारी शनी अमावस्या यात्रा उत्सव रद्द केला आहे. देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर यांच्यासह उपस्थितीत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
कोरोनामुळे यात्रोत्सव रद्द शनिवारी येणाऱ्या अमावस्येला महत्त्व -
शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनिशिंगणापूर मध्ये यात्रोत्सव साजरा केला जातो. वर्षातून केवळ दोन ते तीन वेळेसच असा योग येत असल्याने शनिभक्त ही पर्वणी साधून देशभरातून शनिशिंगणापूरमध्ये येत शनीचे दर्शन घेतात. यादिवशी शनिमूर्तीस अभिषेक केल्यास साडेसाती असणाऱ्यांना मोठा फायदा होतो, अशी भाविकांची भावना आहे. चार ते पाच लाख भाविक शनी अमावस्या पर्वात दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. यानिमित्ताने शनी मूर्तीस सजवले जाते. तसेच विशेष आरतीचे संयोजन केले जाते.
कोरोनामुळे यात्राउत्सव रद्द -
काल 12 मार्चरोजी दुपारी तीन वाजून दोन मिनिटांनी अमावस्येला प्रारंभ झाला असून आज शनिवारी दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी अमावस्या काल संपत आहे. या कालावधीत शनीभक्त मोठ्या संख्येने येण्याची शक्यता असते. देवस्थाने एकूणच राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भावावर वाढत असल्याने वाढती रुग्ण संख्या आणि यात्राउत्सवात कोरोनाचा संसर्ग वाढू शकत असल्याने जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार शनीअमावस्या यात्राउत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, देवस्थानचे पुजारी आणि मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित शनी अमावस्ये निमित्ताने होणारे धार्मिकविधी केल्या जात आहेत.
घरातच शनी आराधना करा, ऑनलाईन दर्शन घ्या -
शनिशिंगणापूर देवस्थानच्यावतीने भक्तांनी शनी अमावस्या निमित्ताने होणारी यात्रा रद्द केल्याचे सांगत कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने घरातूनच शनी आराधना करावी, तसेच ऑनलाईन दर्शनाची सुविधा केली असून ऑनलाईन दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा - ओडिशात होतेय काळा गहू अन् काळ्या हळदीची शेती!