अहमदनगर - जिल्ह्यातील श्री क्षेत्र शनी शिंगणापूर देवस्थाने कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देवस्थान समितीने शनैश्वर मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार आणि आरोग्य विभागाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आज (मंगळवार) संध्याकाळपासून भाविकांना दर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देवस्थानच्या विश्वस्त मंडळाची दुपारी तातडीची बैठक झाली. या बैठकीत सामाजिक जबाबदारी म्हणून दर्शन बंद करण्यात येत असल्याचा ठराव संमत करण्यात आला. देवस्थानच्या अध्यक्षा अनिता दरंदले, उपाध्यक्ष योगेश बानकर, व्यवस्थापक विकास बानकर आदींच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.
CORONA : शनी देवालाही कोरोनाची साडेसाती; शनैश्वर मंदिर दर्शनासाठी बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी साईबाबा पाठोपाठ आता देशभरातून भक्तांचा ओढा असलेले शनी शिंगणापूर मंदिरही दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा -कोरोना इफेक्ट; साईबाबांचे मंदिर अनिश्चित काळासाठी बंद...
जिल्ह्यातील शिर्डी देवस्थानच्यावतीने आजपासून साईबाबा मंदिर दर्शनासाठी दुपारनंतर बंद करण्यात आले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील प्रसिद्ध मोहटादेवी मंदिरही दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. या पाठोपाठ आता देशभरातून भक्तांचा मोठा ओढा असलेल्या शनी शिंगणापूर मंदिर समितीनेही शनी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा हा निर्णय घेतला आहे. शिंगणापूर येथे राज्य आणि परराज्यातून हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात. मात्र, सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना शासनाच्या आणि आरोग्य विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद देत गर्दी टाळण्यासाठी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.