अहमदनगर : शनिशिंगणापूरला ओडिशामधील एका भक्ताने एक किलो 700 ग्रॅम सोने व पाच किलो चांदीचा वापर केलेला एक कोटी रुपयाचा कलश शनी अमावस्येच्या निमित्ताने शनी देवाला अर्पण केला आहे. अनेक वर्षानंतर आलेल्या पौष शनी अमावस्या निमित्ताने शनिवारी दिवसभर आणि रविवारी पहाटेपर्यंत देशभरातून लाखोंच्या संख्येने शनीभक्त शनी शिंगणापूरमध्ये दाखल झाले होते. भक्तांच्या प्रचंड गर्दीचे नियोजन आणि नागरी, आरोग्य सुविधा या शनी देवस्थानच्या वतीने पुरवण्यात आल्या. शनिवारी येणारी अमावस्या हा शनिभक्तांसाठी मोठी पर्वणी असते. त्यात पौष महिन्यात तब्बल वीस वर्षानंतर पौष शनी अमावस्या आल्याने भक्तांनी या दुर्मिळ पर्वणीचा लाभ घेतला.
भक्ताचे एक कोटीचे गुप्तदान :या निमित्ताने एका भक्ताने सहपरिवार येत शनीमूर्ती चरणी सोन्या-चांदीचा एक कोटीचा कलश अर्पण केला. मात्र या भक्ताने आपले नाव जाहीर न करण्याची विनंती देवस्थान प्रशासनाला केली. सायंकाळच्या आरतीनंतर हा स्वर्ण कलश मूर्तीसमोर विधी पूर्वक अर्पण करण्यात आला.मात्र ज्या भक्ताने हा सुवर्णकलश अर्पण केला आहे. त्याचे नाव गुप्त ठेवण्यात यावे, अशी विनंती त्या भक्ताने केल्याने त्याचे नाव देवस्थाने जाहीर केले नाही. सदर भाविकाने हे गुप्तदान केले आहे.