अहमदनगर- कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन करत असलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे चित्र दिसत आहे. आज जिल्ह्यातील एकूण ७ जण कोरोनामुक्त झाले. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील या ७ कोरोनाबाधित रुग्णांना आज बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ४९ झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या ६२ असून त्यापैकी आता १० जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.
दिलासादायक; धांदरफळ येथील ७ जण कोरोनामुक्त, अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत ४९ रुग्णांची कोरोनावर मात.. - बूथ हॉस्पिटल
मागील १० दिवसात धांदरफळ येथील रुग्ण कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात आले. आज जिल्ह्यातील एकूण ७ जण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ४९ झाली आहे.
![दिलासादायक; धांदरफळ येथील ७ जण कोरोनामुक्त, अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत ४९ रुग्णांची कोरोनावर मात.. ptl](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7250235-1110-7250235-1589805997380.jpg)
धांदरफळ येथील रुग्ण कोरोनाबाधित आढळल्यानंतर त्यांना उपचारासाठी बूथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मागील १० दिवसात त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात आले. त्यांना आता आजाराची कोणतीही लक्षणे दिसून येत नसल्याने आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तपासणी करून आज डिस्चार्ज देण्यात आला. त्यांना पुढील १० दिवस संगमनेर येथे संस्थात्मक विलगीकरणामध्ये देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
आतापर्यंत एकूण १८४७ व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी १७३५ स्त्राव निगेटिव्ह आले, तर ६२ व्यक्ती बाधित असल्याचे आढळून आले. आता ४९ व्यक्ती बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत. दरम्यान, जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या पैकी ९ अहवालांची अद्याप प्रतीक्षा आहे.