अहमदनगर- अहमदनगर लोकसभा निवडणुकीचे मतदान आटोपल्यावर युती व आघाडीचे नेते व कार्यकर्त्यांनी आता शिर्डीकडे मोर्चा वळवला आहे. या मतदारसंघाची निवडणूक २९ एप्रिलला होत आहे. तेथील प्रचाराची सांगता येत्या शनिवारी (२७ एप्रिल) सायंकाळी होणार आहे. त्यामुळे राहिलेल्या चार दिवसात शिर्डीचे वातावरण तापवण्याचे नियोजन दोन्हीकडून सुरू आहे. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेनंतर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्याही सभा होणार आहेत. त्यामुळे शिर्डी मतदारसंघातील वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
शिर्डी मतदारसंघ बनला प्रतिष्ठेचा आतापर्यंतच्या निवडणुकांतून नगर व शिर्डी मतदारसंघाच्या निवडणुका एकाच दिवशी होत असल्याने दोन्हीकडे जाहीर सभा, प्रचार फेऱ्यांचा धुराळा उडत असे. पण यंदा प्रथमच या दोन्ही निवडणुका वेगवेगळ्या तारखांना होत असल्याने राजकीय पक्ष व त्यांच्या नेत्यांना तसेच समर्थकांनाही दोन्हीकडील प्रचार नियोजनाला पुरेसा वेळ मिळाला. युती व काँग्रेस आघाडीसह अन्य पक्षांकडूनही आधी नगर मतदारसंघाच्या प्रचार नियोजनाला महत्व दिले गेले. त्यानंतर आता येथील मतदान आटोपल्याने शिर्डीचे प्रचार नियोजन हाती घेतले गेले आहे. नगरचे मतदान झाल्यानंतर दक्षिण नगर जिल्ह्यातील युती व आघाडीचे नेते व कार्यकर्ते शिर्डीकडे रवाना होऊन सक्रियही झाले आहेत. पण हाताशी वेळ कमी असल्याने सगळ्यांचीच धावपळ जोरात सुरू आहे.
तिरंगी लढतीमुळे उत्सुकता-
शिर्डीमध्ये शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे, काँग्रेसकडून आमदार भाऊसाहेब कांबळे या दोन प्रमुख पक्षीय उमेदवारांसह अपक्ष उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेही रिंगणात आहेत. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे संजय सुखदान व अन्य १६ उमेदवारही रिंगणात असले तरी खरी लढत लोखंडे-कांबळे-वाकचौरे अशी तिरंगी मानली जात आहे. लोखंडेंसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली आहे. भाजपने नगरमध्ये युतीकडून डॉ. सुजय विखेंना उतरवले असल्याने आता नगर शहर व दक्षिण जिल्ह्यातील भाजप-शिवसेनेची ताकद तसेच उत्तर नगर जिल्ह्यातील विखेंच्या यंत्रणेची ताकद शिर्डीमध्ये शिवसेनेसाठी एकत्रित काम करणार असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्यासह युतीला टक्कर देण्यासाठी आमदार बाळासाहेब थोरात व त्यांच्या समर्थकांनी कंबर कसली आहे. खुद्द थोरातांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. श्रीरामपुरातील बुहचर्चित ससाणे-मुरकुटे-आदिक यांच्यातील गटबाजी शमविण्यात त्यांना यश आल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर लोखंडे व कांबळेंची लढत दोन्हींकडून प्रतिष्ठेची बनली आहे.
शिवसेनेच्या लोखंडेंसाठी कोपरगावच्या भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे व नेवाशाचे बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह राहाता-शिर्डी-लोणी परिसरातील विखेंची यंत्रणा असल्याचे सांगितले जाते. लोखंडेंविरुद्ध अपक्ष उमेदवारी करून बंडखोरी केल्याने भाजपने माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर हकालपट्टीची कारवाईही करून युती धर्म पाळल्याचेही स्पष्ट केले जात आहे. तर दुसरीकडे कांबळेंसाठी अकोल्यातील राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड, संगमनेरचे आमदार थोरात तसेच श्रीरामपूर येथील ससाणे गट, मुरकुटे गट व आदिक गट सक्रिय असल्याचे सांगितले जाते. याशिवाय खुद्द उमेदवार आमदार कांबळे यांचे येथील समर्थकही मदतीला आहेत. मात्र, नेवाशातील यशवंतराव गडाख समर्थकांच्या पावित्र्याची उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे व पवारांपाठोपाठ आंबेडकर, गांधी व फडणवीस यांच्या सभा होत असल्याने शिर्डीचे वातावरण ढवळून निघणार आहे.