अहमदनगर- बीजमाता म्हणून देशभर प्रसिद्ध असलेल्या अकोले तालुक्यातील पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांची राष्ट्रीय पातळीवरील एका समितीवर निवड झाली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयातर्फे स्थापन करण्यात आलेल्या प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटीज अँड फार्मर्स राईट ॲक्ट अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील निवड समितीवर त्यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यांच्या निवडी संदर्भातील ई-मेल नुकताच प्राप्त झालेला आहे, अशी माहिती बायफचे विभागीय अधिकारी जितीन साठे यांनी दिली आहे.
केंद्रीय समितीमार्फत देशपातळीवर पारंपरिक बियाणे संवर्धन, निर्मिती, संगोपन व प्रचार प्रसार करणाऱ्या व्यक्ती, संस्था, मंडळ व समित्या यांची निवड राष्ट्रीय पातळीवर देण्यात येणाऱ्या पुरस्कारांसाठी करण्यात येते. देशातील उत्कृष्ट बीज संवर्धक निवडण्याची जबाबदारी या समितीवर असते. देशपातळीवर दरवर्षी सुमारे 85 लाख रुपये किंमतीचे पुरस्कार या समितीच्या माध्यमातून निवडण्यात आलेल्या शेतकरी, संस्था व व्यक्तींना दिले जातात. देशपातळीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात पुरस्कारांचे वितरण व रक्कम याच विभागामार्फत दिली जाते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अकोले तालुक्याचे नाव चमकावलेल्या बीजमाता राहीबाई सोमा पोपेरे यांची या समितीवर निवड होणे म्हणजे तळागाळात काम करणाऱ्या गरीब हातांना मिळालेला न्याय म्हणता येईल, अशी भावना सामाजिक स्तरातून व्यक्त होत आहे.