दिल्ली/अहमदनगर -राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अकोले तालुक्यातील कोंभाळणे येथील बीजमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदिवासी शेतकरी राहीबाई सोमा पोपेरे यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. हा सोहळा सोमवारी राष्ट्रपती भवनात पार पडला. महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांच्या पाठोपाठ कोंभाळणे गावाला हा दुसरा सन्मान मिळाला. यामुळे अकोले तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. पोपेरे या शेतकरी असून त्यांना त्यांच्या कृषी क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.
कोण आहेत राहीबाई पोपेरे?
राहीबाई पोपेरे या हायब्रीड वाण आणि रासायनिक शेती यामुळे कुपोषणासहित आरोग्याच्या इतर समस्या वाढल्याने विषमुक्त शेतीसाठी कृतीशील प्रयत्न करत आहेत. सुरुवातीपासूनच शेतीची आवड असल्याने त्यांनी भाजीपाल्यासह अन्य काही पिकांचे गावरान वाण जपण्यास सुरुवात केली. त्यांनी बीया संकलित करून ठेवण्याचा वसा हाती घेतला. सुमारे वीस वर्षांपासून त्यांचे हे काम अथक सुरू आहे. गावरान वाण शोधणे, लागवड करणे, त्यांच्या बीया काढून त्या संकलित करणे, त्या इतरांना पेरणीसाठी देत त्यांना प्रेरणा देणे, त्यांच्या माध्यमातून पुन्हा बीयांचे संकलन करणे, अशा पद्धतीने त्यांच्या बीजबँकेचा विस्तार सुरू आहे. आतापर्यंत त्यांनी 54 पिकांच्या 116 वाणांच्या गावरान बियांचे जतन केले आहे.