अहमदनगर-कोरोनाचा धोका टाळण्यासाठी शाळा बंद असल्याने पहिली ते आठवीच्या परीक्षा घेणे शक्य होणार नाही. जिल्ह्यातील पहिली ते आठवीतील ४९६८ शाळांमधील ६ लाख १९ हजार १४३ विद्यार्थी यंदा थेट पुढच्या वर्गात जाणार आहेत. सातत्यपूर्ण, सर्वंकष मूल्यमापनाच्या आधारे त्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रारंभी जिल्ह्यातील शाळांना १७ ते ३१ मार्चदरम्यान सुट्टी जाहीर करण्यात आली. त्यानंतर १४ एप्रिलपर्यंत देशव्यापी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. परिणामी, पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा प्रश्न निर्माण झाला. सध्याची स्थिती पाहता, शिक्षण विभागाने यंदाचा निकाल सर्वंकष मूल्यमापनाच्या आधारे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ६ लाख १९ हजार १४३ विद्यार्थ्यांना आता पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे.
जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या ४९६८ शाळा आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या ३५७३, महापालिकांच्या १२, नगरपालिकांच्या ३७, समाजकल्याण ३६, खासगी शाळा ७३७, तर अन्य ५७३ शाळांचा समावेश आहे. संचारबंदीमुळे या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे जवळपास अशक्य आहे. परिणामी, वर्षभरात झालेल्या चार चाचण्या व स्वाध्यायाच्या आधारे गुणांकन करून शाळांकडून निकाल जाहीर करण्यात येईल, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
कोरोनापासून बचाव करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नसली, तरी वार्षिक अभ्यासक्रम प्रामुख्याने पूर्ण झाल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर कुठलाही परिणाम होणार नाही. "लर्न फॉर्म होम'अंतर्गत पालकांचे व्हॉट्सअॅप ग्रुप, लिंक, ऑनलाइन टेस्ट आदींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू आहे. त्यामुळे गुणवत्तेवर परिणाम होणार नाही. रोज ५ ते १० पालकांना फोन करून शिक्षक अभ्यासाचा आढावा घेत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी दिली आहे.