अहमदनगर - राज्यात लक्षवेधी असलेल्या अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक संजीव भोर यांनी शनिवारी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. कोणताही गाजावाजा किंवा शक्ती प्रदर्शन न करता त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आपली उमेदवारी ही प्रस्थापितांच्या घरणेशाहीतील वारसा विरोधात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
अहमदनगरमध्ये घराणेशाहीला टक्कर; मराठा क्रांती मोर्चाचे संजीव भोर यांचा अपक्ष अर्ज दाखल - Sanjeev Bhor
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपकडून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे पुत्र डॉ. सुजय विखे आणि राष्ट्रवादीकडून आ.अरुण जगताप यांचे पुत्र आ.संग्राम जगताप यांची उमेदवारी घोषित झाली आहे.
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपकडून विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांचे पुत्र डॉ. सुजय विखे आणि राष्ट्रवादीकडून आ.अरुण जगताप यांचे पुत्र आ.संग्राम जगताप यांची उमेदवारी घोषित झाली आहे. वंचित आघाडीनेही सुधाकर आव्हाड यांना उमेदवारी घोषित केली आहे. एकूणच विखे विरुद्ध पवार-थोरात या दिग्गजांच्या राजकीय संघर्षामुळे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ राज्यात चर्चेत आहे. त्यामुळे सुजय आणि संग्राम हे तगडे उमेदवार रिंगणात असताना त्यांच्याशी लढत देण्यासाठी अभियंता असलेले आणि संघर्षशील आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेले संजीव भोर यांची उमेदवारी सध्या चर्चेचा विषय बनत आहे.
३ दिवसांपुर्वीच भोर यांनी ज्येष्ठ शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांच्या उपस्थितीत एक मेळावा घेत आपली अपक्ष उमेदवारी घोषित केली होती. नगर दक्षिण हा भाग दुष्काळी आणि पाण्यावाचून नेहमीच संकटात आहे. शेतकरी वर्गाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असताना युती सरकार किंवा त्यापूर्वी आघाडी सरकार असताना या भागातील प्रश्न कायम आहेत. सिंचन, रोजगार, शिक्षण आदी समस्या असताना केवळ घराणेशाहीच्या जीवावर धनदांडगे निवडणुका लढवत आले आहेत. जुने प्रश्न कायम असताना आता घराणेशाहीची पुढची पिढी निवडणुकीच्या रिंगणात असल्याने येथील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आपण निवडणुकीच्या मैदानात उतरत असल्याचे भोर यांनी स्पष्ट केले आहे.