शिर्डी (अहमदनगर)- जुन्या वादातून एका तरुणाची धारधार शस्त्रांनी हत्या केल्याची घटना शिर्डीत घडली आहे. संगमनेर तालुक्यातील दिघे या गावातील अजय जगताप असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो शिर्डीमध्ये बहिणीला भेटण्यासाठी आला असता, त्याच्याच मित्रांनी जुन्या वादाच्या रागातून त्याची हत्या केली. हत्येनंतर आरोपींनी स्वतः पोलीस ठाण्यात दाखल होत आपण केलेल्या गुन्ह्याची शिर्डी पोलिसांना दिली आहे.
कोयता घेऊन आलेल्या मित्राचा दोघांनी काढला काटा संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील मयत अजय जगताप याचे शिर्डीत आपल्या बहिणीकडे कायम येणे जाणे असायचे. याच दरम्यान अजयची शिर्डीतील अक्षय थोरात आणि रोहित खरात या दोघांशी ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्याच चांगली मैत्रीही निर्माण झाली होती. मात्र तीन दिवसापूर्वी या तिघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला होता. तोच वाद मिटवण्यासाठी अजय मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अक्षय थोरात याच्या शिर्डीतील रिंगरोड लगतच्या श्रीसाई सभा व मिलिंद थोरात संकुलातील दुकानात गेला होता. तिथे खरात हा देखील उपस्थित होता.
तिघा मित्रांमध्ये झालेल्या वाद मिटवण्यासाठी तिघांनीही रात्री पार्टी केली. मात्र पार्टीच्या दरम्यानही पुन्हा या तिघांना मध्ये वाद निर्माण झाले. यावेळी मात्र खरात आणि थोरात या दोघांनी अजय जगताप याच्या गळ्यावर धारधार शास्त्रांने वार करून त्याची हत्या केली. विशेष म्हणजे या दोन्ही आरोपींनी हत्येच्या घटनेनंतर थेट शिर्डी पोलीस ठाणे गाठले आमि त्यांनी केलेल्या हत्येच्या घटनेची माहिती देत गुन्ह्याची कबुली दिली.
अजयने आणलेल्या कोयत्याने त्याचाच घात-
आरोपी अक्षय थोरात आणि रोहित खरात यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हंटले आहे की, रात्री पार्टी झाल्यानंतर अजयला घरी जाण्यास सांगितले. मात्र त्याने मी इथे झोपतो असे सांगत तो बाहेर लघुशंकेसाठी गेला. त्यानंतर तो पुन्हा दुकानात आल्यानंतर त्याच्या कबरेला कोयता असल्याचे लक्षात आले. त्यामुळे तो आपल्याला मारेल म्हणुन रोहित खरात आणि अक्षय थोरातने तोच कोयता हिसाकावून घेत अजय जगतापचा खुन केल्याची कबुली आरोपांनी शिर्डी पोलीस स्टेशनला येवुन दिली आहे.
शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी जावून मयताचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला. पोलासांनी रोहित खरात आणि अक्षय थोरात या दोघांनाही अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी
302, 34, आर्म एकट 425 नुसार गुन्हा दाखल केला आहे. मृत आणि आरोपी या तिघांवरही यापूर्वी काही गुन्हे दाखल असल्याची माहिती शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.