अहमदनगर -महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली कोरोना संकटात संगमनेर नगरपरिषदेने प्रभावी काम करताना रुग्ण वाढ कमी केली आहे. आगामी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर संगमनेर नगरपरिषद 100 बेडचे आद्यवत कोव्हिड हॉस्पिटल उभारणार असल्याची माहिती नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी दिली.
80 ऑक्सिजन बेडस
कोरोना साथीची तिसऱ्या लाटेची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. या लाटेला सामोरे जाण्यासाठी संगमनेर नगरपरिषद तयारी करीत आहे. सध्या नगरपरिषदेच्या 70 बेडच्या कॉटेज हॉस्पिटल (डिसिएचसी) मध्ये 28 ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. येणाऱ्या लाटेचा विचार करता सदर डिसिएचसी रुग्णालयाचा विस्तार करणे आवश्यक वाटत असल्याने बेडची संख्या 100 पर्यंत वाढवून त्यातील 80 बेडस ऑक्सिजन युक्त करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
नगरसेवकांचे योगदान
परिसरातच एक ऑक्सिजन प्लॅन्टही उभारण्याचा विचार सुरू असून, ऑक्सिजन नेटवर्क व तत्सम यंत्रणा तयार करणे, नवीन बेडस उपलब्ध करण्याची तयारी सुरू आहे. नगरपरिषदेचे चालू असलेले नियोजन पाहून यामध्ये आपलेही योगदान असावे असे नगरसेवकांना वाटले व या प्रस्तावित मोठ्या रुग्णालयासाठी सर्व नगरसेवक, नगरसेविका यांनी एकत्र येऊन 30 नवीन पद्धतीच्या काॅटस देणगी म्हणून देण्याचे जाहीर केले आहे.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून कौतुक
नगरसेवकांच्या या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत असून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी सर्व नगरसेवकांचे अभिनंदन केले आहे. तसेच ऑक्सिजन प्लॅन्ट व ऑक्सिजन नेटवर्क, काॅटस, औषधे इत्यादींसाठी औद्योगिक संस्था, बॅंका, पतसंस्था व आर्थिक संस्थांनी आपल्या सिएसआर फंडातून भरीव मदत करावी, असे आवाहन नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, मुख्याधिकारी डॉ सचिन बांगर व सर्व नगरसेवक, नगरसेविका यांनी केले आहे.