अहमदनगर - प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराजांनी पुत्र प्राप्तीबद्दल वक्तव्य केले होते. या प्रकरणी पीसीपीएनडीटी कायद्या्च्या कलम 22 अंतर्गत संगमनेरच्या सत्र न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. आज(30 मार्च) सत्र न्यायालयाने इंदुरीकरांना दिलासा दिला आहे. दिवाणी न्यायालयात दाखल खटला सत्र न्यायालयाने रद्द ठरवला आहे. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात आता अंधश्रद्धा निर्मुलन समिती दाद मागणार आहे.
न्यायालयाच्या निकालानंतर प्रतिक्रिया हेही वाचा -अभिनेता एजाज खानला अटक, ड्रग तस्कर शदाब बटाटाशी मैत्री पडली महागात
काय आहे प्रकरण?
किर्तनकार निवृती महाराज देशमुख यांनी आपल्या किर्तनातून 'सम तिथीला स्त्रीसंग झाला तर मुलगा आणि विषम तिथीला झाला तर मुलगी होते', याबाबतचे विधान केले होते. पीसीपीएनडीटी कायद्याचा भंग असल्याचे सांगत अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वकील रंजना गवांदे यांनी इंदुरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. यानंतर संगमनेर तालुक्यातील वैद्यकीय अधिकाऱयाने महाराजांविरोधात संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायालयात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा रद्द करावा यासाठी इंदुरीकरांनी सत्र न्यायालयात अपील केले होते. नऊ महिन्याच्या कामकाजानंतर न्यायालयाने आज हे अपील मंजूर केले आहे. इंदुरीकरांनी केलेले वक्तव्य हे जाहीरातीत मोडत नाही, हा इंदुरीकरांच्या वकिलांचा दावा न्यायालयाने मान्य करत हा गुन्हा होत नसल्याचे सांगितले आहे.
अंनिस जाणार उच्च न्यायालयात
इंदुरीकरांच्यावतीने खटला रद्द व्हावा यासाठी दाखल केलेले अपील आज मंजूर केले असले तरी या निकालाविरोधात उच्च न्यायालयात जाण्यासाठी एक महिन्याची स्थगिती द्यावी, असा अर्ज अंनिसच्या वकील आणि या खटल्यातील मुख्य साक्षीदार रंजना गवांदे यांनी न्यायालयात दिला आहे. तो अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. या निकालाच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे रंजना गवांदे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा -पोटात दुखू लागल्याने एक दिवस आधीच शरद पवार ब्रीच कँडीत दाखल