अहमदनगर - सध्या राज्यातील काही भागांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन काय प्रयत्न करत आहे. तालुक्यात कोरोना लसीकरणाची काय स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर महसूमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये बैठक घेऊन, तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.
गेल्या वर्षी देशासह जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. कोरोना काळात महाविकास आघाडी सरकारने राज्यात चांगले काम केले. या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली. मात्र गेल्या 4 महिन्यांमध्ये नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाची पुन्हा एकदा दुसरी लाट राज्यात आली आहे. हे अत्यंत चिंताजनक असून, नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे. लॉकडाऊन हा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचा पर्याय असू शकत नाही, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. धार्मिक कार्यक्रमांमध्ये गर्दी करू नये असे आवाहन यावेळी बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. तसेच आतापर्यंत तालुक्यात 5 हजार नागरिकांनी कोरोनाची लस घेतली असल्याची माहिती देखील थोरात यांनी दिली.
नागरिकांनी घाबरून जाऊ नये
दरम्यान नागरिकांनी लसीकरणाला घाबरून जाऊ नये. ग्रामीण भागामध्ये होणारे घरगुती समारंभ नागरिकांनी जाणीवपूर्वक टाळावेत हा संकटाचा काळ आहे, या काळात भावनेपेक्षा वस्तुस्थितीला प्रत्येकाने महत्त्व द्यावे. नागरिकांनी काही लक्षणे आढळल्यास तातडीने जवळच्या रुग्णालयात तपासणी करुन घ्यावी. कोरोनाची संपूर्णपणे साखळी तोडणे हे आपले सर्वांचे अंतिम उदिष्ट असल्याचे यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी म्हटले आहे.
तालुक्यात कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक
तालुका पातळी, जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गट तसेच गावनिहाय आरोग्य समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत नागरिकांमध्ये जनजागृती सुरू आहे. संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून 171 गावांचा समावेश आहे. मात्र चांगल्या वैद्यकीय सुविधा व नागरिकांनी घेतलेली काळजी यामुळे रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. मागील काळात सहकारी संस्थांनी कोविड केअर सेंटरसाठी तालुका प्रशासनाला मोठी मदत केल्याची माहिती यावेळी संगमनेरच्या प्रांताधिकाऱ्यांनी दिली आहे.
हेही वाचा -भंडाऱ्यातील प्रेमीयुगुलाची वैनगंगेत आत्महत्या; प्रेमाला विरोध असल्याने उचलले पाऊल?