महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Saibaba Sansthan Trust : 'साई मंदिरे बांधण्यासाठी निधी देणार नाही', मंत्री विखे पाटलांची ग्वाही - साई मंदिरासमोर आमरण उपोषण

Saibaba Sansthan Trust : शिर्डीच्या साईबाबा संस्थानने देशभरात साई मंदिरं उभारणीसाठी पुढाकार घेण्याचं जाहीर केलं. त्यानंतर या विरोधात माजी नगराध्यक्षा अनिता जगताप आणि त्यांचे पती माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप यांनी साई मंदिरासमोर आमरण उपोषण सुरू केलं होतं. दरम्यान, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ग्वाहीनंतर आता हे उपोषण मागे घेण्यात आलंय.

Saibaba Sansthan Trust
महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 7, 2023, 12:11 PM IST

Updated : Oct 7, 2023, 12:22 PM IST

शिर्डी Saibaba Sansthan Trust :शिर्डीच्या साईबाबा संस्थानने देशभरात साई मंदिरे उभारणीसाठी पुढाकार घेण्याचं जाहीर केल्यानंतर या निर्णयास शिर्डीकरांकडून कडाडून विरोध झाल्याचं बघायला मिळालं. या निर्णया विरोधात माजी नगराध्यक्षा अनिता जगताप आणि त्यांचे पती माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप यांनी 5 ऑक्टोबर पासून साई मंदिरासमोर आमरण उपोषण सुरू केलं होतं. आता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेत संवाद साधल्यानंतर आता हे उपोषण मागे घेण्यात आलंय.

शुक्रवारी रात्री उशिरा विखे पाटलांनी शिर्डीत येऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, साईसंस्थानचे डेप्युटी सीईओ तुकाराम हुळवळे, प्रांताधिकारी माणिकराव आहेर, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, मुख्याधिकारी सतिष दिघे, निलेश कोते, जगन्नाथ गोंदकर, सुजीत गोंदकर, विजय कोते, प्रमोद गोंदकर, गणेश गोंदकर, दत्ता कोते, मंगेश त्रिभुवन, विकास गोंदकर, आप्पासाहेब कोते, मधुकर कोते आदींसह शिर्डीतील विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

काय म्हणाले मंत्री विखे पाटील :साई संस्थानच्या माध्यमातून देशभर मंदिरे बांधण्याचा किंवा त्यासाठी निधी देण्याचा निर्णय घेतला जाणार नाही. संस्थानच्या तदर्थ समितीनेही असा निर्णय घेतलेला नाही. शासनही त्यासाठी अनुमती देणार नाही. यासंदर्भात साईसंस्थान मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जी भूमिका मांडली ते त्यांचे व्यक्तीगत मत होते, अशी स्पष्ट माहिती मंत्री विखे पाटलांनी दिलीय. तसंच साई मंदिर बांधण्यासंदर्भातील कोणताही निर्णय होणार नाही. साईसंस्थानची निर्णय क्षमता वाढवण्यासाठी लवकरात लवकर व्यवस्थापन मंडळ नेमण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मंदिरासंदर्भात मिळालेल्या आश्वासनानंतर माजी नगराध्यक्षा अनिता जगताप, माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप, उपोषणात सहभागी झालेले भाजपा शहर उपाध्यक्ष रविंद्र गोंदकर यांनी महसूल मंत्री विखे पाटलांच्या हस्ते लिंबुपाणी पिऊन उपोषण मागे घेतले.




विजयादशमीच्या मुहूर्तावर भक्तांसाठी खुली होणार दर्शनरांग : भाविकांसाठी बनवण्यात आलेली दर्शनरांग येत्या विजयादशमीच्या मुहूर्तावर भक्तांसाठी खुली करण्यात येईल. लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधानांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र त्यांना वेळ नसेल तर ऑनलाईन पद्धतीने किंवा नंतर लोकार्पण सोहळा करू असंही विखे पाटील म्हणाले. यावेळी उपोषणकर्ते अनिता जगताप, विजय जगताप व रविंद्र गोंदकर यांच्यासह उपस्थित नागरिकांनी साईसंस्थानचा कारभार, रूग्णालय, महाविद्यालयाची दुरवस्था, भाविकांच्या सोयीसुविधा, कर्मचाऱ्यांचे प्रश्न याकडेही लक्ष वेधलं. दरम्यान, या आंदोलनाचं लोण तालुक्यातील अनेक गावात पोहचलं होतं. निघोज, निमगाव, कोहाळे, पिंपळवाडी, नांदुर्खी बुद्रूक, काकडी, सावळेविहीर बुद्रूक, सावळेविहीर खुर्द, बाभळेश्वर, रूई, दाढ बुद्रूक या अकरा गावातील पदाधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन आपल्या गावांचा आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला होता.

हेही वाचा -

  1. Saibaba Sansthan Trust : साई संस्थान देशभरात उभारणार साईबाबांची मंदिरं; निर्णयाला शिर्डीकरांचा विरोध
  2. Saibaba Sansthan Controversy : साईबाबा संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थांमधील संघर्ष पुन्हा एकदा पेटणार
  3. Protests Against Saibaba Sansthan : शिर्डीत साईबाबा संस्थानच्या विरोधात जनतेनं कसली कंबर, अनेक आंदोलनांचा इशारा
Last Updated : Oct 7, 2023, 12:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details