शिर्डी(अहमदनगर) - राज्यातील मंदिरे खुली करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. येत्या सात ऑक्टोबरला शिर्डीचे साईबाबा मंदिरही खुले केले जाणार आहे. त्यामुळे साई संस्थानने तयारीला सुरुवात केली आहे. कोरोना नियमांचे पालन करुनच भक्तांना दर्शन दिले जाणार आहे. दररोज किती भाविकांना आणि कशा पद्धतीने दर्शन दिले जाईल याची माहिती मंदिर उघडण्याआधी साई संस्थानकडून जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे. तसेच सध्या सोशल मीडियावर साई दर्शनाबाबत व्हायरल होत असलेल्या मेसेजवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही साई संस्थानच्यावतीने करण्यात आले आहे.
माहिती देताना भाग्यश्री बानायत हेही वाचा -शिर्डी : साई मंदिर कलशारोहणाचा वर्धापन दिन साजरा
- 6 एप्रिलपासून मंदिर होतं बंद -
दुसऱ्या लाटेत कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने दुसऱ्यांना साई मंदिर 6 एप्रिलपासून भक्तांना दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. त्यानंतर कोरोना रुग्णांची स़ख्या कमी होऊ लागल्याने मंदिर उघडण्याची मागणी होत होती. साईंचे मंदिर कधी उघडणार याची भक्तांना उत्सुकता होती. आता नवरात्रच्या पहिल्या दिवशी मंदिर उघडणार असल्याने साई मंदिरातील दर्शन व्यवस्था कशी असेल? आम्ही दर्शन कसे करु शकतो? याची उत्सुकता भक्तांना आहे. त्यात सोशल मीडियावर दर्शन व्यवस्थेबाबत वेगवेगळी माहिती पसरत होती. मात्र, साई संस्थानकडून अद्याप कोणतीही माहिती प्रसारित करण्यात आली नव्हती. दरम्यान, भक्तांनी सोशल मीडियावर येत असलेल्या माहितीवर विश्वास न ठेवता, साई संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती दिली जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे.
- कोरोना नियमांचे पालन करून दिले जाणार दर्शन -
सोशल डिस्टन्सिंगसाठी जमिनीवर मार्कीग करणे, ठिकठिकाणी हॅन्ड सॅनिटायझर लावण्याचे काम सध्या सुरू आहे. साई संस्थानकडून मंदिर उघडण्याची सर्व तयारी केली जात आहे. सात तारखेच्या काकड आरतीपासून भाविकांना दर्शन दिले जाणार आहे. मात्र, दिवसभरात किती भाविकांना आणि ऑनलाईन पासेस घेऊन किती आणि ऑफलाईन किती भाविकांना पासेस दिले जातील, याची माहिती अजून देण्यात आली नाही. लवकरच ती देण्यात येणार असल्याचे संस्थानकडून सांगण्यात आले.
हेही वाचा -मुंबईत यंदाही गरबावर बंदी, पालिकेकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर