अहमदनगर - प्लास्टिक बंदीची घोषणा झाल्यानंतरही शिर्डीत प्लास्टिक वापरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते. मात्र, आता साईबाबा संस्थानकडूनच आता पुढाकार घेत मंदीरात प्लास्टिकच्या पिशव्या आणि प्रसाद पाकीटे जाणार नाहीत, याबाबत अमंलबजावणी करण्यास सुरवात केली आहे.
साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी मंदिरात प्रवेश करताना प्रसाद साहित्याकरता प्लॅस्टिक पिशवीचा वापर करु नये. तसेच, साईभक्तांकडुन मंदिरात प्लॅस्टिक साहित्य तसेच पिशवी जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संस्थानच्या संरक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी याबाबत दक्षता घ्यावी, असे आदेश संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर दिले आहेत.
राज्य शासनाने प्लॅस्टिक बंदीचा निर्णय यापुर्वीच घेतलेला आहे. मात्र, तरीही मंदीर परिसरात प्लास्टिक वापरण्याचे प्रमाण दिसून येत होते. आता शिर्डी नगरपालिकेने प्लास्टिक विक्री करणाऱ्यावर शासन नियमानुसार योग्य ती कार्यवाही करणे सुरू केले आहे. तसेच, काही ठिकाणी धाडी टाकत प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत.