शिर्डी- सांगली, कोल्हापूर येथे महापुराने कहर केला होता. पुरामुळे तेथील नागरिकांचे हाल झाले आहे. त्यामुळे त्यांच्या मदतील राज्यातील प्रत्येक स्तरातून मदतीचे हात सरसावले आहेत. याचप्रमाणे शिर्डी संस्थानाने देखील मदतीचा पुढाकार घेत पूरग्रस्तांसाठी मदत निधीचा चेक मुख्यमंत्र्यांना दिला. मात्र या कार्यावेळी संस्थान अध्यक्षांनी विश्वस्तांना सोबत घेतले नाही. त्यामुळे साई संस्थानच्या विश्वस्तांनी आज व्यवस्थापनाच्या बैठकीवर बहिष्कार टाकून आपली नाराजी व्यक्त केली.
या प्रकरणाबाबत माहिती देताना शिर्डी साई संस्थानाचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे मात्र, याबाबत संस्थानाच्या विश्वस्तांनी दुजोरा दिला नसला तरी नगराध्यक्षा वगळता कुणीही बैठकीकडे फिरकले नाही. त्यामुळे संस्थानाचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे आणि विश्वस्त असलेल्या शिर्डीच्या नगराध्यक्षा अर्चना कोते या दोघांनाच आजची बैठक घ्यावी लागली. मात्र दुपारी दोन वाजता सुरू होणारी बैठक तब्बल दीड तास उशिराने सुरू झाली.
डॉ. सुरेश हावरे यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दहा कोटींचा चेक मुख्यमंत्री निधीसाठी दिला होता. हा चेक त्यांनी १६ ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी विश्वस्त आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर यातील कुणीही उपस्थीत नव्हते. त्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसापूर्वी झालेल्या विश्वस्तांच्या उपसमितीच्या बैठकीत व नंतरही संस्थान परिसरात दबक्या आवाजात याबाबत चर्चा सुरू होती. किमान आपल्याला याबाबत कळवायला हवे होते, अशी विश्वस्तांची अपेक्षा होती.
विश्वस्तांनी मात्र बहिष्कार घातल्याचा नकार दिला
याबाबत विश्वस्तांनी मात्र बहिष्कार घातल्याचा नकार दिला. विश्वस्त अॅड. मोहन जयकर, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपण कामानिमित्त दिल्लीत असल्याने बैठकीला आलो नसल्याचे सांगितले. बिपीन कोल्हे यांचा संपर्कच होवू शकला नाही. तर राजेंद्र सिंह यांनी बैठकीला येणार नसल्याचे अगोदरच कळवले होते. मात्र नगराध्यक्षा अर्चना कोते यांनी व्यवस्थापनाच्या बैठकीला उपस्थिती लावली होती.
१७ विश्वस्तांच्या व्यवस्थापनातून शासनाने बऱ्याच जणांची नियुक्ती केले होती. त्यातील शिवसेनेचे तीनल विश्वस्त आलेच नाहीत, तर अन्य तिघांनी वेगवेगळ्या कारणाने राजीनामे दिले होते. सध्या सहाच विश्वस्त काम पहात आहेत. यावेळी अर्चना कोते यांनी शिर्डी व पदसिद्ध विश्वस्त साईसंस्थान शहराच्या विकासाचे अनेक विषय संस्थानकडे असल्याने आपण बैठकीला आलो आहोत. मात्र बहिष्काराबाबत माहिती नसल्याची त्यांनी कबुली दिली आहे.
विश्वस्तांनी आपल्या भावना माझ्याकडे व्यक्त केल्या असत्या तर त्यांचा गैरसमज दुर केला असता
याबाबत साईबाबा संस्थानाचे अध्यक्ष, डॉ. सुरेश हावरे म्हणाले की, पूरस्थिती गंभीर असल्याने सर्व विश्वस्तांशी फोनवरून चर्चा करून ११ ऑगस्टला निधी जाहीर केला. पुढच्या तीन दिवसात तातडीने उच्च न्यायालयाची व शासनाची मान्यता घेवून चेक तयार करण्यात आला. न्यायालयाने १७ ऑगस्टच्या आत मदत देण्याचे निर्देश दिले होते. त्यातच १५ व १७ ऑगस्टला सुट्टी होती त्यामुळे मदतीचे महत्व लक्षात घेवून व मुख्यमंत्र्यांची मिळेल तशी वेळ घेवून चेक त्यांच्याकडे सोपविण्यात आला. विश्वस्तांनी याबाबत त्यांची भावना माझ्याकडे व्यक्त केली असती तर त्यांचा गैरसमज दुर केला असता असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.