महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गुरुपौर्णिमेला दरवर्षी शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांनी यंदा येऊ नये; साई संस्थानचे आवाहन - gurupornima saibaba celebration

4 जुलै ते 6 जुलै दरम्यान गुरुपौर्णिमा उत्‍सव येत असून, पदयात्री साईभक्‍तांनी कोरोना विषाणू (कोविड 19) चा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी पालखी घेऊन शिर्डी येथे येऊ नये, तसेच संस्‍थानला सहकार्य करावे असे आवाहन संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.

saibaba
शिर्डी साईबाबा

By

Published : Jun 12, 2020, 8:00 AM IST

अहमदनगर - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिनांक 17 मार्च पासून साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आले. 4 जुलै ते 6 जुलै 2020 रोजी साई मंदिरात साजरा करण्यात येणारा गुरुपौर्णिमा उत्‍सव साई संस्थानच्या वतीने साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. पायी पालखी घेऊन येणाऱ्या पदयात्रींनी शिर्डी येथे येण्‍याचे टाळावे, असे आवाहन संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.

कोरोना संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपायांकरीता आणि विषाणूची बाधा एकमेकांना होवू नये म्‍हणून, सरकारकडून सध्या अनलॉक 1.0 सुरू आहे. संस्‍थानच्‍या वतीने 17 मार्चपासून साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आले आहे. साईबाबांचा महिमा व त्‍यांची शिकवणूक संपूर्ण जगात पोहचलेली असून त्‍यांचा भक्‍त वर्ग देशात आणि परदेशात मोठ्या प्रमाणात आहे. तसेच साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने दरवर्षी श्रीरामनवमी, गुरूपौर्णिमा, पुण्‍यतिथी आदी प्रमुख उत्‍सवांचे आयोजन करण्‍यात येते.

पालखीसह येणारे पदयात्री या उत्‍सवांचे प्रमुख्‍य वैशिष्‍टये असतात. त्‍यामुळे राज्‍यासह देशाच्‍या कानाकोपऱ्यातून पालखीसह येणाऱ्या पदयात्रींची संख्‍या ही मोठ्याप्रमाणात असते. यावर्षी कोरोना विषाणूच्‍या संकटामुळे समाधी मंदिर 17 मार्च 2020 पासून ते शासनाच्‍या पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्‍यात आलेले आहे. त्‍यामुळे नुकताच पार पडलेला श्रीरामनवमी उत्‍सव अतिशय साध्‍या पध्‍दतीने साजरा करण्‍यात आला. संस्‍थानच्‍या आवाहनाला प्रतिसाद देऊन सर्व पदयात्रींनी सहकार्य केले. त्‍याचप्रमाणे 4 जुलै ते 6 जुलै दरम्यान गुरुपौर्णिमा उत्‍सव येत असून, पदयात्री साईभक्‍तांनी कोरोना विषाणू (कोविड 19) चा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी पालखी घेऊन शिर्डी येथे येऊ नये, तसेच संस्‍थानला सहकार्य करावे असे आवाहन डोंगरे यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details