शिर्डी(अहमदनगर)-कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 17 मार्चपासून साईबाबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले. मंदिर बंद असल्याने भाविक येत नाहीत. यामुळे अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची कमाई बंद झाली. ते आर्थिक अडचणींना तोंड देत आहेत. दुसरीकडे बँका, फायनांन्स कंपन्या आणि बचतगट संस्था या खातेदारांना हप्त्याची मागणी करू लागल्याने आता आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
साईबाबांच्या शिर्डीत उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक राज्यातून नागरिक येथे येऊन स्थायिक झाले आहेत. बहुतांश व्यवसाय हे साईभक्तांवरच अवलंबून आहेत. मात्र, मंदिर बंद असल्याने भाविक येत नाही. त्यामुळे शिर्डीचे सर्व व्यवहार ठप्प आहेत. परिणामी अनेक लोक बेरोजगार झालेत.
कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शिर्डीत गेल्या अनेक वर्षांपासून राहत असलेल्या खरात यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. हाताला काम नसल्याने दत्तात्रय खरात यांना शेतात कामाला जाण्याची वेळ आली. खरात यांची पत्नी लोकांच्या घरी धुणी-भांडी करते. मात्र, आता कोरोनामुळे त्यांचे कामही सुटलेय. शेतात काम करून मिळणाऱ्या पैशातून कुटुंबाचा खर्च चालविण्याचा प्रयत्न खरात करत आहेत. फायनांस आणि बचतगटाचे घेतलेले कर्जाचे हप्ते कसे भरावेत? हा प्रश्न त्यांच्या पुढे निर्माण झाला आहे.