अहमदनगर - शिर्डीत गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या साईबाबा पुण्यतिथी सोहळ्याची आज सांगता झाली. काल्याच्या कीर्तनानंतर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्या हस्ते दहीहंडी फोडून सोहळ्याचा शेवट करण्यात आला.
असे झाले सांगता दिनाचे कार्यक्रम -
आज उत्सवाच्या सांगता दिनी पहाटे ४.३० वाजता काकड आरती, त्यानंतर पहाटे ५.२० वाजता साईबाबांना मंगल स्नान घालून पुन्हा आरती झाली. सकाळी ६.३० वाजता संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे व त्यांची पत्नी संगिता बगाटे यांच्या हस्ते गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा करण्यात आली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे व त्यांची पत्नी वैशाली ठाकरे यांच्या हस्ते समाधी मंदिरात साईबाबांची पाद्यपुजा करण्यात आली. सकाळी १० वाजता संभाजी तुरकणे यांच्या कीर्तनानंतर दहीहंडी फोडण्यात आली. त्यानंतर साईबाबांची मध्यान्ह आरती झाली. सायंकाळी ६.०० वाजता साईबाबांची धुपारती व रात्री १०.३० वाजता शेजारती होणार आहे.
शिर्डी साईमंदिरातील पुण्यतिथी सोहळा सांगता भिक्षा झोळी कार्यक्रमात जमा झालेले दान -
साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी रुढी परंपरेनुसार आयोजित करण्यात आलेल्या प्रतिकात्मक भिक्षा झोळीत काल साई भक्तांनी भरभरुन दान दिले. यामध्ये गहु, तांदुळ, बाजरी, ज्वारी, तुरदाळ, मुगदाळ, मसूरदाळ, हरभरा, हरभराडाळ, रवा, शेंगदाणा, गुळ, साखर, शुध्द देशी तुप व खाद्य तेल आदींचा समावेश आहे. २ लाख ८५ हजार २७२ रुपयांची चांदी व ७० हजार ३०८ रुपयांची रोख रक्कम अशी एकूण ३ लाख ५५ हजार ५८० रुपयांची देणगी भिक्षा झोळीव्दारे संस्थानला प्राप्त झाली आहे. पुण्यतिथी उत्सवाच्या औचित्यावर हैदराबाद येथील साईभक्त सुनिल शहा यांनी १ हजार ५१५ ग्रॅम वजनाची चांदीची परडी संस्थानला देणगी रुपात दिली आहे.
'सबका मालिक एक' असा संदेश संपूर्ण जगाला देणाऱ्या साईबाबांनी १५ ऑक्टोबर १९१८ ला दसऱ्याच्या दिवशी महासमाधी घेतली होती. साईबाबांची जीवनशैली अत्यंत साधी सरळ होती. पाच घरी भिक्षा मागून जे मिळेल ते अगोदर पशु प्राण्यांना आणि भुकेलेल्यांना वाटून देत असत आणि नंतरच स्वत: ग्रहण करत असत. आजही साईबाबा संस्थानने पुण्यतिथी सोहळ्यात बाबांच्या भिक्षा झोळीची परंपरा अविरतपणे सुरू ठेवली आहे. आपल्या दारात भिक्षा मागण्यासाठी आजही साईबाबा भिक्षेकऱ्याच्या रुपात येतात. अशी श्रद्धा ठेऊन ग्रामस्थ साईंच्या झोळीत भरभरुन दान देतात.