शिर्डी (अहमदनगर) Sai Baba Death Anniversary 2023: यावेळी संस्थानचे तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी पोथी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी वीणा आणि प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे व खरेदी विभागाचे प्र.अधिक्षक अविनाश कुलकर्णी यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला होता. ही मिरवणूक द्वारकामाईत पोहचल्यानंतर तेथे साईसच्चरित्र या ग्रंथाच्या अखंड पारायणास सुरुवात झाली. यावेळी प्रथम अध्यायाचे वाचन संस्थानचे तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी केले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते श्रींची पाद्यपूजा: श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त समाधी मंदिरात संस्थानचे तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या हस्ते श्रींची पाद्यपूजा करण्यात आली. यावेळी प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे, संरक्षण अधिकारी आणासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, उप वैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे व खरेदी विभागाचे अधिक्षक अविनाश कुलकर्णी उपस्थित होते.
मंदिराला आकर्षक सजावट:साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. मुंबई येथील द्वारकामाई मंडळाने साकारलेला पन्नास फुट राम मंदिराचा देखावा भाविकांचं मुख्य आकर्षण ठरत असून हजारो भाविक विजयादशमी अर्थात पुण्यतिथी उत्सवात साईदर्शनासाठी गर्दी करताहेत. उत्सवाच्या सांगता दिनी 26 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील साईचरणी लीन होणार आहेत. साई मंदिराच्या नवीन दर्शन कॉम्पलेक्स उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार असल्याने शिर्डीत उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.