अहमदनगर- दुष्काळी परिस्थितीत नेहमीच होरपळणाऱ्या जामखेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भुतवडा तलावातील गाळ काढण्याचे काम दोन दिवसात सुरू करू, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. तीन दिवसांपूर्वीच शहरात पाण्यासाठी दोन गटात प्रचंड हाणामारी होऊन परस्परांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी जामखेड तालुक्यातील जवळा, राजेवाडी, खांडवी, भुतवडा तलाव, हापटेवाडी, पाटोदा व जामखेड येथे भेट देत कार्यकर्ता संवाद मेळाव्यात मार्गदर्शन केले.
यासोबतच पाण्याची अडचण असणार्या ठिकाणी सामाजिक हेतू समोर ठेवून बारामती अॅग्रोतर्फे टँकर सुरू करू आणि लोकांना टंचाईच्या काळात दिलासा देऊ, असे रोहित पवार यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काकासाहेब तापकीर, राजेंद्र कोठारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
रोहित पवारांचा जामखेड दौरा मतदान संपताच काहींचे टँकर बंद - रोहित पवार
यावेळी बोलताना पवार म्हणाले, सध्या परिसरात भयानक दुष्काळी परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. शहरात पाण्यावरून दंगली होत आहेत. बारामती अॅग्रोतर्फे कर्जत जामखेड तालुक्यात ८० टॅकर सुरू आहेत. जिथे गरज असेल तिथे नवीन टँकर सुरू करू, काल दंगल झालेल्या ठिकाणी नवीन दोन टँकर सुरू करू, असेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या काळात काही नेत्यांनी टॅकर सुरू केले होते आणि मतदानानंतर सर्व टँकर बंद केले. हे फक्त दाखवण्यापुरतेच होते, हे योग्य नाही, अशी टीका त्यांनी विखे यांचे नाव न घेता केली.
छावण्यात राजकारण आणि निकृष्ट चारा-
यावेळी रोहित पवार यांनी मतदारसंघातील एकूणच चारा छावण्यांबाबत नाराजी व्यक्त केली. अनेक छावण्या ह्या पालकमंत्री शिंदे यांच्या कार्यकर्त्यांच्याच आहेत. अशात छावण्यांत निकृष्ट दर्जाचे खुराक आणि कमी प्रमाणात चारा पुरविला जातो, असा आरोप पवार यांनी केला.