अहमदनगर : कर्जत-जामखेड या मतदारसंघासाठी रोहित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अंतिम टप्प्यात आहे. मात्र, अद्याप पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली नसली, तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी एक प्रकारे रोहित पवार यांची उमेदवारी घोषित केली आहे.
विविध वृत्तपत्र व वाहिन्यांना माहितीसाठी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी एक पत्रक काढले असून, यामध्ये कर्जत-जामखेड मतदारसंघातील अधिकृत उमेदवार रोहित पवार यांबदद्ल कोणतेही प्रसिद्धीपत्रक अथवा जाहिराती संदर्भात जिल्हाध्यक्षांचे अधिकृत पत्र असल्याशिवाय प्रसिद्ध करू नये, अशी सूचना केली आहे.
या पत्रात रोहित पवार हे 'अधिकृत उमेदवार' असल्याचे सूचित करण्यात आले आहे. यावरूनच कर्जत जामखेड मतदारसंघाची उमेदवारी रोहित पवार यांना निश्चित झाल्याची माहिती मिळते.
हेही वाचा रोहित पवारांबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
जामखेड मतदारसंघातून सलग दहा वर्षे राम शिंदे हे भारतीय जनता पक्षाकडून निवडून येत असून, यंदा विजयाची हॅटट्रिक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या परिस्थितीत शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनीही गेल्या दीड वर्षापासून या मतदारसंघात कंबर कसली आहे. तसेच लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी मतदारसंघात मोठे शक्तिप्रदर्शन केले. अजित पवार, जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे आदींच्या उपस्थितीत कर्जत आणि जामखेड येथे मोठ्या सभा घेऊन विजयासाठी राम शिंदे यांच्यासमोर आव्हान निर्माण केले आहे.
हेही वाचा 'अजित पवारांचा राजीनामा हे त्यांना उशिरा सुचलेले शहाणपण'
प्रचारासाठी काही दिवस बाकी असताना अधिकृतरित्या उमेदवारी घोषित झाली नसली, तरीही पक्षाकडून एक प्रकारे रोहित पवार यांना अपेक्षेप्रमाणे हिरवा कंदील देण्यात आला आहे.