अहमदनगर- जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. जिल्ह्यामध्ये सर्वत्र हीच परिस्थिती आहे. त्यामुळे पालकमंत्री आपले पालकत्व निभावतात का असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी उपस्थित केला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत तर मला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
राम शिंदे हे नावापुरतेच पालकमंत्री, मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित - रोहित पवार - शेतकरी
जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे चारा छावण्या 31 ऑगस्टनंतरही सुरू ठेवण्याची मागणी रोहित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.
रोहित पवार कर्जत-जामखेड मतदारसंघातून येत्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. त्यांनी सोमवारी (29 जुलै) जिल्हाधिकारी कार्यालयात कर्जत-जामखेडसह जिल्ह्यातील विविध प्रश्नांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. जिल्ह्यातील प्रश्न सोडवण्याची मागणी त्यांनी केली. चारा छावण्यांचा प्रश्न रोहित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडला. राज्य सरकारने चारा छावण्या 31 ऑगस्टपर्यंत सुरु ठेवण्याचे धोरण घेतलेले आहे. मात्र, अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यात अजूनही दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याने चारा छावण्या यापुढेही सुरू ठेवण्याची मागणी त्यांनी केली. मे महिन्यानंतर जून आणि जुलै या दोन महिन्यांचे बिल मिळालेले नाहीत. त्यामुळे चारा छावणी चालकही अडचणीत आल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. कर्जत-जामखेड मतदार संघात वीज वितरण कंपनीकडून अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडवण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.