अहमदनगर- शरद पवार हे व्यक्ती नसून एक विचार आहेत. केंद्रीय कृषिमंत्री असताना त्यांनी सामान्य शेतकरी जनतेसाठी अनेक कामे केलेली आहेत. त्यामुळे आज काही नेते जरी पक्ष सोडून गेले असले तरी सामान्य मतदार शरद पवार यांच्या सोबतच आहेत. त्यामुळेच मोदी-शाह महाराष्ट्रात आले की त्यांना पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय राहवत नाही. पवारांवर टीका केली तर आपण माध्यमात चमकू या आशेनेही लोक टीका करत असतात. तरी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचेच बहुमत दिसेल, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.
कर्जत-जामखेड मतदारसंघात जलयुक्त शिवारची भरपूर कामे झाली असे सांगणाऱ्या पालकमंत्र्यांनी रस्ते बांधण्याशिवाय इतर दुसरी कोणतीही विकासाची कामे केलेली नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते आणि राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार रोहित पवार यांनी केली आहे. जलयुक्तच्या कामातील तफावतीमुळेच त्यांचे खाते बदलण्यात आले काय, असा टोलाही रोहित यांनी पालकमंत्री राम शिंदेंना लगावला.