अहमदनगर- सुरुवातीची चार वर्षे पालकमंत्र्यांनी आपल्या कर्जत-जामखेड मतदारसंघात कामेच न केल्याने जनतेतील नाराजीचा सूर लक्षात घेताच वर्षभर त्यांनी काही कामे केली. मात्र, पराभवाच्या भीतीने केलेली ही कामे असून त्यामुळे येत्या विधानसभेत कर्जत-जामखेडचा निकाल वेगळा असेल असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांसोबत तालुक्यात पाहणी दौरा केल्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते.
पालकमंत्री राम शिंदे जनतेत पसरलेल्या नाराजीमुळे धास्तावले असल्याचे सांगत, आपल्या उमेदवारीवर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. कर्जत-जामखेडमध्ये आम्हाला सतत पराभव स्वीकारावा लागला असल्याने यावेळी पक्ष नवीन चेहरा देतील, असे सांगत कर्जत-जामखेडमधूनच आपल्या उमेदवारीचे संकेत रोहित पवार यांनी दिले आहेत.