अहमदनगर - शेती पंपाचे वीजबिल भरण्यास मुदतवाढ आणि मध्यरात्रीच्या सुमारास शेती पंपास देण्यात येणारा वीजपुरवठा योग्यवेळी देण्यात यावा, या मागण्यांसाठी व्यापाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी आज राहाता तालुक्यातील खंडोबाची वाकडी येथे गाव बंद ठेवत सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन केले.
हेही वाचा -'पाठकबाईं'साठी आ.रोहित पवार 'राणादा'.. जामखेड होणार स्वच्छ, सुंदर,हरित शहर
महावितरणकडून सर्वत्र सक्तीची वीज वसुली सुरू करण्यात आली आहे. ज्याच्याकडून वीजबिल मिळत नाही त्याच्या शेत पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. बहुतेक वीज धारकांना वीज कनेक्शन तोडण्याची नोटीस देखील देण्यात आली आहे.
आधीच पिकांना अतिवृष्टीचा फटका, त्यात आता वीजतोडणी
मागील वर्षी काढणीस आलेल्या पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला. यात शेकडो हेक्टर पीक क्षेत्र पाण्याखाली सापडले. शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झाले. त्यातच कोरोना या भयंकर आजारामुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाल्याने गेल्या दहा महिन्यात शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झाले आहे. आजही शेती पिकाला योग्य भाव नाही. अशात महावितरणने सक्तीची वीजबिल वसुली सुरू केली आहे. शेती पंपाचे वीज कनेक्शन तोडण्याचे काम हाती घेतले आहे. सध्या गहू, कांदा, मका, हरभरा ही पिके अंतिम सिंचनात असताना शेती पंपाची वीज तोड केल्यास शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जाऊ शकतो. त्यामुळे, महावितरणने सदर बाबी लक्षात घेऊन सवलत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
....या आहेत मागण्या
महावितरणने आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना शेती पंपाच्या वीजबिल भरणासाठी मुदत वाढ द्यावी. तसेच, वाकडी परिसरातील काही भागात बिबट व अन्य हिंस्र प्राण्यांचा वावर आहे. त्यामुळे, मध्यरात्रीच्या सुमारास शेती पंपास होणार वीज पुरवठा योग्य वेळी देण्यात यावा, या मागण्यांसाठी आज वाकडी येथील शिवाजी चौकात व्यापारी वर्ग, ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी महावितरण विरोधात सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन केले.
हेही वाचा -'महाविकास आघाडी सरकार पूजावर अन्याय होऊ देणार नाही'