अहमदनगर- शिवसेनेने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना शिर्डी मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर माध्यमांशी बोलताना शिवसेना दक्षिणेत सुजय विखेंना मदत करेल, तर शिर्डीत राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह त्यांचा परिवार मला मदत करणार असल्याचा गौप्यस्फोट लोखंडे यांनी केला.
राधाकृष्ण विखे पाटलांसह त्यांचा परिवार मला मदत करणार; सदाशिव लोखंडेंचा 'गौप्यस्फोट' - उमेदवारी
शिर्डीत राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह त्यांचा परिवार मला मदत करणार असल्याचा गौप्यस्फोट सदाशिव लोखंडे यांनी केला आहे.
शिवसेनेने शिर्डीचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर शिर्डीतील शिवसेना कार्यालयासमोर शिवसैनिकांनी फटाके फोडत जल्लोष साजरा केला. लोखंडे यांची २ दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी श्रीगोंदा येथे भेट झाली होती. यावेळी दोघांनी सोबत जेवणही केले होते. त्यावेळी विखे पाटलांशी काय चर्चा झाली, असे विचारले असता लोखंडेनी राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचा परिवार मला शिर्डी लोकसभा मतदार संघातुन युती धर्म म्हणून मदत करणार असल्याचे वक्तव्य केल्याचे सांगितले.
राधाकृष्ण विखे पाटलांचे पुत्र सुजय विखेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मुंबईत उध्दव ठाकरेंची भेट घेतली होती. यावेळी शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडेही उपस्थित होते. तिथेच विखेंची शिर्डीतून शिवसेनेच्या उमेदवाराला अर्थात लोखंडेना मदत मिळेल, असे स्पष्ट झाले होते. मात्र, राधाकृष्ण विखे पाटील हे अद्याप काँग्रेसमध्येच आहेत. विखेंना माननारे अनेक कार्यकर्ते सुजयबरोबर भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे लोखंडेच्या आजच्या वक्तव्याने त्यात आणखी भर पडली आहे.