अहमदनगर - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. प्रत्येक नेत्यांनी आपापले गड शाबूत राखण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. जिल्ह्यातील श्रीरामपूर मतदारसंघातही यावेळी तुल्यबळ लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. या मतदारसंघातून भाऊसाहेब कांबळे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे तसेच सदाशिव लोखंडे हे आपल्या मुलासाठी इच्छुक आहेत.
ऊस आणि कांदा उत्पादकांचा तालुका अशी श्रीरामपूरची ओळख आहे. जिल्हा मुख्यालयास लागणाऱ्या सर्व इमारती या तालुक्यात आहेत. श्रीरामपूरला स्वतंत्र आर. टी. ओ. आणि अप्पर जिल्हा पोलीस कार्यालय आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने हवी असणारी उत्तम वाहतूक व्यवस्था तसेच रेल्वेची उपलब्धता आहे. अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन होऊन श्रीरामपूर हा जिल्हा व्हावा अशी मागणी सातत्याने पुढे येत असते. अपवाद वगळता श्रीरामपूरचे राजकारण हे आदिक, मुरकुटे आणि ससाणे या गटांभोवतीच फिरत राहिलं आहे.
दिवंगत आमदार आणि साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष जयंतराव ससाणे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना राम लक्ष्मणाची जोडी म्हणून ओळखलं जायचं. जयंत ससाणे हे गोविंदराव आदिक आणि माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या तालमीत वाढलेले. 1999 साली राष्ट्रवादी स्थापन झाली आणि जयंत ससाणे यांनी राष्ट्रवादीचे त्यावेळचे उमेदवार भानुदास मुरकुटे यांचा अवघ्या 500 मतांनी पराभव केला. त्यानंतर ससाणे 2004 सालीही आमदार झाले. 2009 साली हा मतदारसंघ अनुसुचित जातीसाठी राखीव झाला आणि ससाणे समर्थक भाऊसाहेब कांबळे हे सलग दोन वेळा आमदार झाले. जयंत ससाणे यांच्या निधनानंतर राजकीय गणित बदलली आहेत. लोकसभा निवडणुकीत थोरातांनी ससाणे आणि विखे समर्थक भाऊसाहेब कांबळे यांना काँग्रेसची उमेदवारी मिळवून दिली होती. मात्र, शिवसेनेच्या सदिशिव लोखंडे यांनी त्यांचा पराभव केला.