अहमदनगर - लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीसह भाजपच्या बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. नगर दक्षिणच्या जागेसाठी आघाडीकडून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे तर युतीकडून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील निवडणुकीच्या रणांगणात उतरलेत. या मतदारसंघात शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: लक्ष घातल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.
शिर्डी (पूर्वीचा कोपरगाव) लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती प्रवर्गाच्या लोकसंख्या निकषात अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला. तेव्हापासून उत्तरेच्या काँग्रेसी पुढाऱ्यांची आणि त्यात खासदरकीसाठी नेहमीच स्पर्धेत असलेल्या विखे परिवाराने आपली नजर दक्षिण नगरकडे वळवली. त्याचाच प्रत्येय सध्या नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत आहे. नगर दक्षिणमध्ये जे राजकीय नाट्य सुरू आहे त्याचे पडसाद आघाडीवर पडताना दिसत आहेत. डॉ. सुजय विखेंचा या जागेसाठी आग्रह नसता तर भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी विरुद्ध राष्ट्रवादीच्या ढाकणे, घुले, कळमकर यापैकी एकजण निवडणुकीच्या रिंगणात असते आणि एक सामान्य लढत म्हणून या मतदारसंघाकडे पाहिले गेले असते.
- २०१४ परिस्थिती
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दिलीप गांधी हे भाजपकडून विजयी झाले होते. त्यांनी राष्ट्रवादीच्या राजीव राजळे यांचा पराभव केला होता.
- विखे पाटलांचे मतदारसंघात जाळे
विखे परिवाराने डॉ. सुजय यांच्या रूपाने आपली पुढची पिढी राजकारणात उतरवण्यासाठी नगर दक्षिणची रणभूमी निवडली आहे. बाळासाहेब विखे यांनी जिल्हा विकास आघाडीच्या माध्यमातून दक्षिणेत तालुका-तालुक्यात आणि गावा-गावात सर्वपक्षीय मित्र केले आहेत. विखेंनी एकनिष्ठ कार्यकर्त्यांचे एक मोठे जाळे अनेक वर्षांपासून विणलेले होते. त्याचा लाभ बाळासाहेबानंतर राधाकृष्ण विखे यांना होतच होता. त्यामाध्यमातून जिल्हा परिषद, जिल्हा सहकारी बँक आपल्या ताब्यात ठेवण्यात विखे अनेकदा यशस्वी झाले. हा दबदबा कायम ठेवण्यासाठी, राज्यात आणि त्याचबरोबर पक्षांतर्गत विरोधक बाळासाहेब थोरात यांच्यावर मात करण्यासाठी दिल्ली सर करणे गरजेचे होते. त्यासाठी डॉ सुजय विखे हे ३ वर्षांपासून नगर दक्षिणेत जनसेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून कामाला लागले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा १९९९, २००९, २०१४ ला गमावलेली आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा सातत्याने पराभव झाला ही वस्तुस्थिती आहे. या आधारावर जागांची अदलाबदली करून नगर दक्षिण काँग्रेस पक्षाला आणि पर्यायाने सुजय विखेंना सहज मिळेल असा अंदाज राधाकृष्ण विखेंचा होता. या भूमिकेला काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांच्यासह सर्व वरिष्ठांचा (अगदी बाळासाहेब थोरतांचाही) पाठींबा होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातत्याने आम्ही जागा काँग्रेसला सोडणार नाही असे स्पष्ट केले होते. त्यांची ही भूमिका स्वतः शरद पवारांशी पूर्ण विचारांती होती हे नंतर स्पष्ट झाले आहे.
- मतदारसंख्या