संगमनेर(अहमदनगर)- देशात सध्या कोरोनाचे मोठे संकट आहे. मात्र अशा संकटात कोरोनाशी लढण्याऐवजी भारताचे पंतप्रधान आणि सर्व केंद्रीय मंत्री सत्तेसाठी निवडणुका जिंकण्यात व्यग्र होते, अशी टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. पाच राज्यातील निकाल रविवारी जाहीर झाले, त्यावरून थोरात यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
लोकांना शाश्वत विकास पाहिजे भूलथापा व जाहिरातबाजी नको. त्यामुळेच मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या भाजपाबद्दल भारतीय जनतेमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. परिणामी भाजपाची पिछेहाट सुरू झाली असल्याची प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
थोरात पुढे म्हणाले की , जनतेला शाश्वत विकास व सुरक्षितता हवी आहे. मात्र भाजपाने मागील सात वर्षात फक्त जाहिरातबाजी केली आहे. कोणतेही विकासाचे काम केले नाही. पेट्रोल-डिझेलच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. महागाईने जनता त्रस्त झाली असून देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. सर्वत्र बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. देशात हे सर्व मोठे प्रश्न निर्माण झाले असताना कोरोनाचे मोठे उभे संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत देशातील जनतेला मदत करण्याऐवजी भाजपाचे सरकार सत्तेसाठी निवडणुकांमध्ये भावनिक मुद्दे निर्माण करून जनतेचे लक्ष विचलित करत आहेत.