शिर्डी (अहमदनगर) -कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रावर मंदीचे सावट असल्याने राज्याची अर्थव्यवस्थाही कोलडमली होती. बाजारातील मंदी व अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ लक्षात घेऊन महसूल विभागाने बांधकाम क्षेत्राला व अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा चांगला फायदा झाला असून बांधकाम क्षेत्रात तेजी येऊन घर खरेदी करणाऱ्यांनाही मोठा फायदा झाला आहे, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
दस्तनोंदणीत ४८ टक्क्यांनी वाढ -
मुद्रांक शुल्कात सरसकट 3 टक्के सवलत दिली गेली. या सवलतीमुळे घर खरेदीस चालना मिळून बांधकाम क्षेत्रालाही संजीवनी मिळाली आणि राज्याच्या तिजोरीतही महसूल जमा झाला. महसूल विभागाने राबाविलेलेल्या या योजनेमुळे सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत 2019 च्या तुलनेत दस्तनोंदणीत 48 टक्के तर राज्याच्या महसुलात 367 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेने व उद्योगक्षेत्राने गती पकडली असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले.
बांधकाम क्षेत्रातील मरगळ झटकून अर्थव्यस्थेला चालना -
यशोधन कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आ.डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे उपस्थित होते. थोरात म्हणाले की, बांधकाम क्षेत्रात आलेले मंदीचे सावट दूर करुन या क्षेत्राला चालना देण्यासाठी तसेच घर खरेदी करणारे या दोघांचे हित लक्षात घेऊन मुद्रांक शुल्क कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे बांधकाम क्षेत्रात तेजी येऊन मरगळलेल्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळाली. राज्य सरकारच्या या निर्णयाचे केंद्र सरकारनेही कौतुक केले असून इतर राज्य सरकारांनीही महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाचे अनुकरण करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.