अहमदनगर- मागील सरकारच्या काळात दुष्काळावेळी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर टँकर, चारा छावण्यात घोटाळा झाला असून राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजना राबवली त्यातही घोटाळा झाल्याने त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली. यापूर्वी अनेकवेळा भाजप सरकारच्या काळात घोटाळे झाल्याचे आरोप झाले आहेत.
अहमदनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी हसन मुश्रीफ यांची नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच सोमवारी (दि. 20 जाने.) मुश्रीफ अहमदनगरला आले होते. त्यांच्या उपस्थितीत अहमदनगर जिल्हा नियोजनाची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीत अहमदनगर जिल्ह्यातील रस्ते, शाळा या विषयांवर जास्त निधीची मागणी अनेक सदस्यांनी केली. त्याचबरोबर जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दुष्काळाच्या काळात झालेल्या विविध कामात झालेल्या घोटाळ्यांच्या चौकशीची मागणी केली.
घोटाळ्यांच्या चौकशीच्या निमित्ताने भाजप सरकारमध्ये पालकमंत्री राहिलेले राम शिंदे यांच्यावर रोहित पवार यांनी निशाणा साधल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. घोटाळ्याबाबात उच्चस्तरीय चौकशी करण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला. तो शासनाला पाठवून याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे हसन मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.