राहुरी(अहमदनगर)- तालुक्यातील केंदळ गावातील डोंगरे कुटुंबियांवर एकामागून एक संकटे येत आहेत. वडिलांची किडनी निकामी झाल्याने डायलिसीससाठी नेण्याचे काम १५ वर्षीय रेणुका डोंगरे या मुलीला करावे लागत आहे. रेणुका तिच्या आई आणि आजोबांना कामामध्ये मदत करतेय, पण वडिलांसाठी किडनी दाता मिळण्यासाठी उपचारांसाठी समाजाच्या मदतीची गरज आहे.
वडिलांच्या आरोग्यासाठी धडपडतेय रेणुका अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातील केंदळ या छोट्याश्या गावात डोंगरे हे शेतकरी कुटुंब राहते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या कुटुबियांची पाठ दवाखाना सोडत नाही. त्र्यंबक डोंगरे या ८१ वर्षे ओलांडलेल्या शेतकऱ्याच्या दोन मुलांच्या किडन्या आधी निकामी झाल्या होत्या. त्या दोन्ही मुलांना त्र्यंबक आणि त्यांच्या पत्नीने एक एक किडनी दिली. त्यासाठी मोठा खर्चही झाला मात्र ते दोघेही वाचू शकले नाहीत. त्र्यंबक डोंगरेंचा तिसरा मुलगा आणि रेणुकाचे वडिल राहुल यांच्याही दोन्हीही किडण्या निकामी झाल्या आहेत. त्यांना आठवड्यातून दोनदा रक्तशुद्धीकरण (डायलिसीस) करण्यासाठी ४० किलो मीटर अंतरावर नगरला न्यावे लागत आहे.
वडिलांना डायलिसीसला नेण्याची जबाबदारी रेणुकावर
रेणुकाचे आजोबा त्र्यंबक डोंगरे राहूल यांना डायलिसीससाठी घेऊन जात होते. त्यांना वयोमानामुळे शक्य होत नाही. यामुळे वडिलांना डायलिसीसाठी नेण्याची जबाबदारी रेणुकावर आली आहे. कोरोनामुळे एसटी, रेल्वे बंद झाल्यानंतर रेणुकाने वडिलांना ३ महिने दुचाकीवर नगरला घेऊन जात होती.
रेणुकाच्या संघर्षाला समजाच्या मदतीची गरज
रेणुकाच्या कुटुंबाची परिस्थिती गरिबीची आहे. वडिलांच्या आयुष्याची दोरी बळकट करण्यासाठी तिचा संघर्ष सुरू आहे. डोंगरे कुटबियांकडे दोन एकर शेती आणि दोन गाई आहेत. त्यातून मिळाणाऱ्या पैशांवर उपचार आणि घर खर्च चालवावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे रेणुकासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. पैसा कमी पडू लागलाय घरातील परिस्थिती बिकट होतेय. तरीही रेणुकाचा संघर्ष सुरू आहे मात्र वडीलांना किडनी डोनर मिळवून त्यांचा उपचार करण्यासाठी तिला समाजाच्या मदतीची गरज आहे.
रेणुका आता दहावीत शिकत आहे. तिने अजून शाळेची फी भरलेली नाही. घरात वृद्ध आजी- आजोबा, आई, एक भाऊ आहे तोही मतिमंद, शिर्डी येथे मूकबधिर विद्यालयात नववीत आहे. एक भाऊ तिच्याच शाळेत पाचवीत शिकतोय. गेल्या अकरा वर्षांपासून या कुटुबियांची होणारी फरफट थांबण्यासाठी आता समाजातील दानशुरांनी मदतीचा हात देण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे.