अहमदनगर Religious Disputes Rahuri : जिल्ह्यातील गुहा येथील कानिफनाथ देवस्थानाचा वाद आता पुन्हा उफाळून आला आहे. आज (सोमवारी) अमावस्येनिमित्त सुरू असलेल्या पूजा आणि धार्मिक कार्यक्रमात एका समाजाच्या पुरुष तसंच महिलांच्या जमावानं मंदिरात शिरून पूजारी आणि भाविकांना मारहाण केली. यामुळे गुहा गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. (dispute over worship)
तोडगा काढण्याचा प्रयत्न निष्फळ :राहुरी तालुक्यातील गुहा येथील कानिफनाथ देवस्थानावरून दोन समाजात गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. याबाबत न्यायालयात खटला दाखल आहे. प्रशासनानं दोन्ही समाजाच्या ज्येष्ठ लोकांच्या अनेक वेळा बैठका घेऊन तोडगा काढण्यासाठी प्रयत्नही केले. यावर दोन्ही समाजाला मान्य होतील असा तात्पुरता तोडगा देखील काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, अद्यापही तोडगा निघालेला नसल्यानं हा वाद वारंवार उफाळून येत असल्याचं पाहायला मिळत आहे.
'ते' अनधिकृत धार्मिक स्थान सिल करा :13 नोव्हेंबर रोजी सकाळी अमावस्येनिमित्त पूजा करण्यासाठी गेलेल्या पुजाऱ्याला आणि भाविकांना दुसऱ्या समाजातील लोकांनी महिलांना बरोबर घेऊन धार्मिक ठिकाणी जाऊन जबर मारहाण केली. या घटनेमुळं गावात दोन समाजात चांगलाच तणाव निर्माण झाला. या घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला समजताच मोठा फौजफाटा गुहा गावात तैनात करण्यात आला. सध्या परिस्थिती नियंत्रणात आली आहे. मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून मंदिराशेजारी असलेलं अनाधिकृत धार्मिक स्थान सील करण्याची मागणीही यावेळी एका गटाकडून करण्यात आली आहे. दोन्ही गटांनी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
भोंग्यावरून होणारा वाद शमला : राज्यात एकेकाळी भोंग्यावरून राजकीय वातावरण चांगलच तापलं होतं. पण एक गाव असंही आहे की, ज्या गावात भोंगेच नाहीत. नांदेड जिल्ह्यातील हे आहे बारड (ता.मुदखेड) गाव. या गावात कुठल्याच धार्मिक स्थळावर भोंगे दिसणार नाहीत. 30 जानेवारी 2017 मध्ये बारड ग्रामपंचायतीनं गावात भोंगे बंदीचा ठराव घेतला. या ठरावाला सर्वच जाती धर्माच्या लोकांनी होकार दिला. गत 5 वर्षांपासून बारड या गावात भोंग्याचा आवाज कधी वाजलाच नाही. तेव्हापासून येथे कुठल्याही धार्मिक गटात वाद झालेला नाही.