अहमदनगर-अहमदनगरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात आज सकाळी अतिदक्षता विभागामध्ये अचानक आग लागली. या घटनेमध्ये या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असलेले 17 रुग्णांमधील तब्बल 11 रुग्णांना जीव गमवावा लागलेला आहे. या रुग्णांच्या नातेवाईकांमधून संताप व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील उत्तर आणि दक्षिण या भागातील दोन्ही खासदार डॉ. सुजय विखे आणि सदाशिव लोखंडे यांनी या ठिकाणी भेट देत रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा देण्याचे काम केले. त्याचबरोबर शहराचे आमदार संग्राम जगताप हे दिवसभर या ठिकाणी तळ ठोकून होते.
हेही वाचा-अहमदनगर जिल्हा रुग्णालयात आग : दोषींवर कडक कारवाई होणार - मंत्री हसन मुश्रीफ
रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संताप-
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे काम केले. मात्र, एकूणच परिस्थिती पाहता रुग्णांचे नातेवाईक यांनी मोठा संताप आज दिवसभर या ठिकाणी व्यक्त केला. मृत पावलेले व्यक्तींचे शवविच्छेदन यालाही वेळ लागत होता. शवविच्छेदन केंद्राबाहेर रुग्णवाहिका मोठ्या संख्येने नातेवाइकांनी बोलून घेतलेल्या होत्या. मात्र, मृतदेह ताब्यात मिळत नसल्याने त्यांना वाट पाहण्याची वेळ आली. त्यामुळेही नाराजीचे वातावरण दिसून आले. ऐन दिवाळी सणात झालेल्या दुर्घटनेमुळे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे.