महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 19, 2021, 12:27 PM IST

ETV Bharat / state

बाळ बोठेने अण्णा हजारेंना पत्र पाठवल्याचा जरेंचा दावा, पत्र आले नसल्याची सूत्रांची माहिती

वरिष्ठ पत्रकार आणि एका आघाडीच्या दैनिकाचा संपादक असताना बोठे याने एक लेखमालिका प्रकाशित केली होती. या लेखमालेवर आधारित पुस्तकाच्या प्रकाशनाला जिल्ह्यातील अनेक आमदार, विविध राजकीय पक्षांचे नेते यांच्याबरोबरच अण्णा हजारेंनाही निमंत्रित केले होते. या कार्यक्रमात बोठेचा अण्णांच्या हस्ते सत्कार झाला होता. तसेच, त्याच्या एका पुस्तकाचा पुणे विद्यापीठाने संदर्भ म्हणून अभ्यासक्रमात समावेश केला होता. मात्र, आता विद्यापीठाने अभ्यासक्रमातून हे पुस्तक मागे घेतले आहे.

Ahmednagar Bal Bothe Latest News
अहमदनगर बाळ बोठे लेटेस्ट न्यूज

अहमदनगर - यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेला मास्टरमाइंड वरिष्ठ पत्रकार बाळ बोठे याने समाजसेवक अण्णा हजारे यांना एक पत्र पाठवून पोलिसांबद्दल तक्रार केली असल्याचा दावा रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे यांनी केली आहे. रुणाल जरे यांनी एक ऑडिओ क्लिप माध्यमांना पाठवून हा दावा केला असला तरी अण्णांच्या विश्वसनीय निकटवर्तीयांकडून असे कुठलेही पत्र अण्णांना वा कार्यालयाला मिळाले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

पोलीस त्रास देत असल्याचा कथित पत्रात दावा

रुणाल जरे यांनी याबाबत दावा केला आहे की, बाळ बोठेचे हे पत्र दोन दिवसांपूर्वी अण्णांना कुणाच्या तरी हस्ते पोहोच करण्यात आले. पोस्टाचा पुरावा टाळण्यासाठी बोठे याने एका व्यक्तीच्या हस्ते हे पत्र पोहोच केले. या पत्रात बोठे याने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील आणि तपास अधिकारी उपअधीक्षक संदीप पाटील हे आपल्याला या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार केली असल्याचे रुणाल जरे यांचे म्हणणे आहे. हे पत्र अण्णांकडे गेल्यानंतर त्यांनी ते वाचले. मात्र, अण्णांनी पत्र वाचल्यानंतर अण्णांनी बोठे याच्याबद्दल नाराजी व्यक्त करत पत्र फाडून फेकून दिले, असेही जरे यांचे म्हणणे आहे.

बाळ बोठेने अण्णा हजारेंना पत्र पाठवल्याचा जरेंचा दावा
असे पत्र अद्याप मिळाले नसल्याचे निकटवर्तीयांचे स्पष्टीकरण

याबाबत ईटीव्ही भारत प्रतिनिधीने अण्णांचे कार्यालयीन प्रमुख समन्वयक संजय पठाडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी असे कोणतेही पत्र अण्णांना थेट अथवा कार्यालयाला अद्याप आले नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, अण्णा अशा कोणत्याही वैयक्तिक बाबतीत कधीही लक्ष घालत नाहीत किंवा पाठपुरावा करत नाहीत, असे ते म्हणाले. तसेच आलेल्या पत्रांना फाईल करून ठेवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, जरे यांच्या सांगण्याप्रमाणे कोणतेही पत्र आले नसल्याचे पठाडे यांनी स्पष्ट केले.

विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या भेटीत बोठे विषयावर चर्चा नाही

तीन दिवसांपूर्वीच नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी राळेगणसिद्धीमध्ये अण्णा हजारे यांची भेट घेतली होती. या वेळी, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील हेही उपस्थित होते. या भेटीत रेखा जरे-बाळ बोठे प्रकरणाची चर्चा झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबतच्या चर्चा निराधार असून दिघावकर यांनी नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांची काही व्यापाऱ्यांकडून झालेली फसवणूक आणि त्याबाबत पोलिसांनी केलेल्या कारवाईवर चर्चा झाल्याचे संजय पठाडे यांनी सांगितले. निवृत्तीनंतर सामाजिक आणि शेतीविषयक कामात रस असल्याचे आणि त्यासाठी अण्णा हजारे हे आपला आदर्श असल्याचे दिघावकर म्हणाले.

बाळ बोठेचा अण्णांच्या हस्ते झाला होता सत्कार

वरिष्ठ पत्रकार आणि एका आघाडीच्या दैनिकाचा संपादक असताना बोठे याने एक लेखमालिका प्रकाशित केली होती. तसेच, या लेखमालेवर आधारित एक पुस्तक प्रकाशित केले होते. या पुस्तक प्रकाशनाला जिल्ह्यातील अनेक आमदार, विविध राजकीय पक्षांचे नेते यांच्याबरोबरच अण्णा हजारे यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात अण्णांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला होता. बाळ बोठे याने दरम्यानच्या काळात काही पुस्तके लिहून प्रकाशित केली होती, त्यातील एका पुस्तकाचा पुणे विद्यापीठाने संदर्भ म्हणून अभ्यासक्रमात समावेश केला होता. मात्र, बोठे हा रेखा जरे हत्याकांड प्रकरणात आरोपी म्हणून पुढे आल्यानंतर विद्यापीठाने अभ्यासक्रमातून हे पुस्तक मागे घेतले आहे. बोठे याने कायद्याच्या पदवीबरोबरच डॉक्टरेट पदवी मिळवली आहे. त्यामुळे तो स्वतःच्या नावापुढे संपादक, डॉक्टर, अ‌ॅडव्होकेट, लेखक अशा विविध पदव्या लावत समोरच्यावर प्रभाव पाडत असल्याचे बोलले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details