शिर्डी- भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा वर्णी लागल्याने आता प्रदेशाध्यक्षपदी कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. तर, शपथविधी उरकल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे शिर्डी विमानतळावरून औरंगाबादकडे रवाना झाले. यावेळी नवीन प्रदेशाध्यक्षपदी कोण या प्रश्नाला दानवेंनी बगल दिल्याचे पाहायला मिळाले.
केंद्रीय राज्यमंत्री दानवे शिर्डीत आल्यानंतर साई मंदिरात न जाता विमानतळावरूनच वाहनाने औरंगाबादकडे निघाले. यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला असता पंतप्रधान नरेंद मोदींनी दिलेल्या संधीचे आभार त्यांनी आभार मानले. राज्यातील केंद्राकडे प्रलंबित प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच माझ्यामध्ये असलेल्या क्षमतेचा पूर्ण वापर करून राज्याला अधिक फायदा मिळवून देणार असल्याचेही दानवे म्हणाले. मात्र, आता नवीन प्रदेशाध्यक्ष कोण यावर उत्तर देण टाळत 'कमुन माझ्या तोंडून नाव काढून घेता' अस उत्तर देत प्रश्नाला बगल दिली.
केंद्रीय राज्यमंत्री मंत्री रावसाहेब दानवे
दरम्यान, केंद्रात पुन्हा मोदी सरकार आल्यावर रावसाहेब दानवे यांना पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदाची संधी मिळाली आहे. दानवे यांच्या प्रदेशाध्यक्षपदाची मुदत जानेवारी २०१९ मध्ये संपली असली तरी पक्षांतर्गत निवडणुका लोकसभेच्या निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आल्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, प्रदेशाध्यक्ष दानवे आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांना मुदतवाढ देण्यात आली होती.
दानवे यांना २०१४ मध्येही मोदी मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपद मिळाले होते. पण तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्याने दानवे यांची जानेवारी २०१५ मध्ये भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. आता देशात पुन्हा मोदी सरकार आल्यानंतर दानवे यांचा अनुभव व महाराष्ट्रातील राजकीयदृष्टय़ा प्रमुख मराठा समाजाची पार्श्वभूमी यामुळे त्यांना पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्षपदासाठी पक्षाला नवीन नेता निवडावा लागेल.
आता भाजपचे राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष अमित शाह यांचीही केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेटमंत्री म्हणून निवड झाल्याने भाजपला राष्ट्रीय अध्यक्षही निवडावा लागणार आहे. त्यामुळे या सर्व निवडणुका आता लवकरच होऊन नव्या नेतृत्वासह पक्ष विधानसभा निवडणुकीला सामोरे जातो की विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर नव्या नेमणुका होतात याबाबत भाजपमध्ये उत्सुकता आहे.