अहमदनगर - वंचित बहुजन आघाडी व वार्ड क्रमांक २१ मधील रहिवाशांनी शेवगाव येथील रेसीडेंशियल हायस्कूल मिरी रोडवर रास्ता रोको केला. वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
मलमूत्रयुक्त पाणी नळाद्वारे येणे तसेच गटारीतील पाणी रस्त्यावर साचल्याने वार्ड क्रमांक २१ मधील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. ९ नोव्हेंबरला वंचित बहुजन आघाडी व वार्ड क्रमांक २१ मधील रहिवाशांनी शेवगाव नगरपरिषदेला निवेदन दिले होते. परंतु, नगरपरिषद आणि या वार्डातील नगरसेवकाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांच्यावतीने येथे रास्ता रोको करण्यात आले.
या रस्ता रोको आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीचे शेख प्यारेलाल भाई, लखन घोडेराव, अॅड गलांडे, पप्पू गर्जे, रावसाहेब जाधव, प्रसाद पहिलवान, संदिप गवळी, विनोद सावंत, राजूभाई शेख आदींसोबतच वार्ड क्रमांक २१मधील इतर रहिवासी मोठ्या प्रमाणात हजर होते. रास्ता रोको केल्याने शेवगाव नगर परिषद सीईओ गरकळ, नगराध्यक्ष विनोद मोहिते, अशोक आहुजा, वार्ड क्रमांक २१ चे नगरसेवक भाऊसाहेब कोल्हे तातडीने आले व कामास जलदगतीने सुरुवात केली. यानंतर रास्ता रोको आंदोलन थांबविण्यात आले.