अहमदनगर - चिचोंडी, तिसगाव या गावांना जोडणाऱ्या साडेसहा कोटी रुपयांच्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप पाथर्डी तालुका पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पालवे यांनी केला आहे. तसेच याविरोधात त्यांनी चिचोंडी येथे रास्ता रोको आंदोलन केले आहे.
पाथर्डी तालुक्यातील चिंचोडी, तिसगाव या गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बांधण्यात आलेला हा रस्ता सुमारे १५ किमी लांबीचा असून, या रस्त्यावर अनेक ठिकाणी पूलही आहेत. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील काही पूलही वाहून गेले आहेत. तसेच ठिकठिकाणी खडी वाहून गेल्यामुळे रस्त्याला मोठमोठाले खड्डे पडले आहेत. या रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी करण्यात येत आहे. मात्र, याला शासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पुलाच्या कामासाठी ठेकेदाराने फुटलेले पाईप टाकल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला. तर, हा रस्ता वाहतुकीसाठी योग्य राहिला नसल्याचे पालवे म्हणाले. या रस्त्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले होते.