शिर्डी(अहमदनगर) - साईबाबांच्या शिर्डीत (Shirdi Saibaba Rangpanchami) आज रंगपंचमीनिमित हजारो भक्तांनी रंग खेळून रंगपंचमी उत्सव साजरा केला. आपल्या जीवनात सुख आणि समाधान राहावे म्हणून रंगपंचमीला साईबाबांना कृष्ण अवतार माणून भक्त रंगपंचमी साजरी करतात. रंगपंचमीचे खास वैशिष्ठ म्हणजे साईंची रंगबेरंगी रथ यात्रा. या रथ यात्रेमध्ये भक्त व शिर्डी ग्रामस्थ सहभागी होऊन आनंद साजरा करतात.
त्या काळात साईबाबा स्वत: लहान मुलांसोबत द्वारकामाई आणि चावडीत रंगपंचमी खेळायचे. ही परंपरा आजही साईबाबा संस्थानसमवेत शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्तांनी कायम ठेवली आहे. आज साईमूर्ती आणि साई समाधीलाही रंग लावण्यात आला. यानंतर साईबाबांना रंगीत वस्त्र परिधान करून साईबाबांची आरती तसेच पूजा करण्यात आली.