अहमदनगर -साईबाबांच्या शिर्डीत आजपासून तीन दिवस रामनवमी उत्सवाला सुरुवात झाली. दरवर्षी तीन दिवस रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. या वर्षी मात्र कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी साई मंदीर भक्तांना दर्शनासाठी बंद करण्यात आल्याने काही मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत रामनवमी उत्सवाच्या पहिल्या दिवशीचे धार्मिक विधी करण्यात आले.
शिर्डी : कोरोनाच्या सावटा खाली रामनवमी उत्सवाला सुरुवात
शिर्डीत रामनवमी उत्सवाला सुरुवात झाली. दरव्रर्षी तीन दिवस मोठ्या उत्साहात चालणारा उत्सव, यावर्षी साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे.
पहाटेच्या काकड आरतीनंतर साईंच्या मूर्तीला स्नान घालण्यात आले. त्या नंतर साईंच्या पोथी, पादुका फोटो आणि विणेची मिरवणूक समाधी मंदिरातून काढण्यात आली होती. प्रथे प्रमाणे द्वारकामाईत उद्या सकाळपर्यंत अखंड साईचरित्राच पठण करण्यात येणार आहे. साई चरीत्र पठणास सुरुवात करण्यात आली आहे.
दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहत असतात. मात्र, यंदा साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी उप कार्यकारी अधिकारी आपल्या कुटुंबा समवेत या कार्यक्रमांना उपस्थित होते. साई संस्थानच्या इतिहासात इतक्या साध्या पध्दीतीने साजरा होणारा हा पहिलाच उत्सव आहे.