शिर्डी (अहमदनगर) - आज (3 ऑगस्ट) श्रावणी सोमवार आणि नारळी अर्थात राखी पोर्णिमा हा बहीण-भावाचा पवित्र सण शिर्डीतही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आज साईबाबांच्या मुर्तीला मंदिरातील पुजाऱ्यांचा हस्ते राखी बांधण्यात आली आहे. तसेच श्रावणी सोमवार निमित्ताने साईंच्या मुर्तीला बिल्वपत्रांची माळही घालण्यात आली असून साई समाधी समोर महादेवाची प्रतिमा ठेवण्यात आली आहे.
आज साईबाबांच्या मुर्तीला भाविकांनी पाठवलेल्या राख्या मंदिरातील पुजाऱ्यांचा हस्ते बांधण्यात आल्या - शिर्डी साईबाबा बातमी
शिर्डीतील साईबाबांच्या मुर्तीला काकड व मध्यान्ह आरतीनंतर भाविकांनी पाठवलेल्या राख्या बांधण्यात आल्या. दरवर्षी लाखो भक्त मंदिरात येऊन राख्या अर्पण करतात. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्याने अनेक भाविकांना राख्या कुरीअरने पाठवल्या आहेत.
सोमवारी पहाटेच्या काकड आरतीनंतर साई मुर्तीला मंगलस्नान घालण्यात आले. त्यानंतर साई मुर्तीला भरजरी वस्र घालण्यात आले. मुंबईच्या एका साईभक्ताने पाठवलेली सुंदरशी मोठी राखी मुर्तीच्या हातात पुजाऱ्यांच्या हस्ते बांधण्यात आली. दुपारच्या मध्यान्ह आरती नंतर हैदराबाद येथील एका भाविकाने पाठवलेली राखी बांधण्यात आली आहे.
साईबाबा हयातीत असताना शिर्डीतील महिला बाबांना रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधत. आजही ही परंपरा साई संस्थान आणि भाविकांना कडून सुरू आहे. दरवर्षी भाविक रक्षाबंधनच्या दिवशी बाबांना राखी घेऊन येतात. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 17 मार्चपासून साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे भाविकांनी या वर्षी कुरियरच्या माध्यमातून राख्या पाठवल्या आहेत. आज रक्षाबंधन असल्याने शिर्डीतील पंचाक्रोषितील महिला साईबाबांना भाऊ मानत राखी घेऊन येत असत. मात्र, मंदिर बंद असल्याने यंदाचा वर्षी घरीच बाबांची पूजा करून बाबांचा प्रतिमेला राख्या बांधण्याचे अवाहन यावेळी साई संस्थानचा वतीने करण्यात आले आहे.