अहमदनगर -शिर्डी मतदार संघात आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा सायंकाळी ५ वाजता सुरू होणार होती. मात्र, सकाळी गांधींच्या विमानात खराबी आल्याने ही सभा ५ च्या ऐवजी साडे आठ वाजता सुरू झाली. त्यानंतर साधारण साडे नऊ वाजता राहुल गांधी मंचावर आले आणि त्यांनी सभेला झालेल्या उशिराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. यावेळी त्यांनी मोदींवर जोरदार टीका करत देशात दर तासाला 27 हजार युवक बेरोजगार होत आहेत, असा हल्लाबोल केला.
पंतप्रधान मोदी देशाच्या अर्थव्यवस्थेचे कोणतेही नुकसान न करता देशातील २५ कोटी जनतेला दरवर्षी ७२ हजार देणार होते. मात्र, त्यांनी हे आश्वासन पाळले नाही. त्यांच्या धोरणामुळे दर तासाला २७ हजार युवक बेरोजगार होत आहेत. नोटाबंदीच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, मोदींनी गरीबांचा पैसा घेवून अंबानींना दिला आहे. त्यांच्यामुळे लोकांनी कपडे खरेदी करणे बंद केले आहे. तसेच फॅक्टरीवाल्यांनी कामगारांना काढून टाकले आहे, अशी टीका त्यांनी केली.
पाच वर्षात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आमचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू, असे आश्वासन त्यांनी या सभेत दिले. ते म्हणाले, आज व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारच्या १५ खात्यांची परवानगी घ्यावी लागते. मात्र, २०१९च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर युवकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणाची परमिशन घेण्याची गरज नाही, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
शिर्डी मतदार संघासाठी २९ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यामुळे आज शहरात काँग्रेस पक्षाकडून शेवटच्या टप्प्यात गांधी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी पोलीस प्रशासनाने ठिक-ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
सभेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाचे बडे नेते हजर राहणार आहेत. यात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदेचा समावेश आहे. विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या विरोधीपक्ष नेता पदाचा राजीनामा दिल्यामुळे गांधी यावर काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रात काँग्रेसचीच सत्ता येणार - पृथ्वीराज चव्हाण
महाराष्ट्रातील भाजपची सत्ता जाणार असून येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार येणार आहे, असे दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. ते म्हणाले, यापुढच्या कोणत्याही लोकसभा निवडणुकीत मोदी पंतप्रधान असणार नाहीत, असे चव्हाण म्हणाले.