अहमदनगर - प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला 2020 साठी नागरी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील पोपटराव पवार आणि राहीबाई पोपरे यांच्यासह 21 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.
'बीजमाता’ राहीबाई पोपरे यांना पद्मश्री पुरस्कार
'बीजमाता’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई पोपरे या अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे गावच्या रहिवासी आहेत. त्या विविध पिकांचे गावरान वाणांचे जतन करण्याचे काम करतात. राहीबाईंना सुरवातीपासूनच शेतीची आवड असल्याने त्यांनी भाजीपाल्यासह अन्य काही पिकांचे गावरान वाण जपण्याचा, त्यांच्या बिया संकलित करून ठेवण्याचा वसा हाती घेतला. सुमारे वीस वर्षांपासून त्यांचे हे काम सुरू आहे.
हेही वाचा - 'अनिवासी भारतीयांचे सदैव देशाच्या विकासात योगदान'
गावरान वाण शोधणे, त्यांची लागवड करणे, त्यांच्या बिया काढून त्या संकलित करणे, याच बिया इतरांना पेरणीसाठी देणे, त्यांच्या माध्यमातून पुन्हा याच बियांचे संकलन करणे, अशा पद्धतीने त्यांच्या बीजबँकेचा विस्तार सुरू आहे. आतापर्यंत त्यांनी ५४ पिकांच्या ११६ वाणांच्या गावरान बियांचे जतन केले आहे. त्यांच्या या कामासाठी महिला दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते ‘नारीशक्ती’ सन्मानानेही गौरवण्यात आले आहे. राहीबाई यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार त्यांच्या आजवरच्या कामाचा गौरव आहे.
"मला जो पुरस्कार जाहीर झाला आहे, तो आत्तापर्यंत केलेल्या काळ्या आईच्या सेवेसाठी आहे. बायफ या संस्थेमुळे मला माझे काम सर्वांपर्यंत पोहचवता आले. या पुरस्काराने मला व माझ्या कुटुंबाला खूप आनंद झाला आहे. मी सर्वांची आभारी आहे. मी शाळा शिकले नाही मात्र, निसर्गाच्या शाळेने मला खूप काही शिकवले. निर्सगाची नीतिमूल्ये जपत यापुढेही मी कार्य करत राहील. माझा आदिवासी समाज आणि सर्व अकोलेकरांच्यावतीने मी हा पुरस्कार अतिशय नम्रपणे स्वीकारते."
- बीजमाता राहीबाई पोपरे