शिर्डी- भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली. थोरात यांचे कर्तृत्वच काय आहे? ते तर सध्या मातोश्रीचे उंबरठे झिजवत आहेत, अशी बोचरी टीका त्यांनी केली. याचबरोबर त्यांनी राज्य सरकार गोंधळलेल असून कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
विखे म्हणाले, की मी काँग्रेस पक्ष सोडला म्हणून बाळासाहेब थोरात यांना पद मिळाले, यात थोरातांचे स्वतःचे कर्तृत्व काय गांधी नेहरुंचे विचार सोडून ते मातोश्रीचे उंबरठे झिजवत आहेत. राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी बाळासाहेब थोरातांनी पुढाकार घेतला असता तर आनंद वाटला असता. मात्र केवळ सत्तेत वाटा मिळवण्यासाठी लाचारी केली जात आहे. स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी थोरातांची धडपड सुरू असल्याचा आरोप करत विखे यांनी थोरांतावर बोचरी टीका केली.