अहमदनगर - विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे आज अचानक साई दर्शनासाठी शिर्डीत आले. मुंबई ते थेट शिर्डी आणि शिर्डी ते मुंबई असा त्यांचा रिटर्न प्रवास झाल्याने याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
विखे पाटील साई दरबारी, काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळेंची घेतली भेट
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे आज अचानक साई दर्शनासाठी शिर्डीत आले. यावेळी त्यांनी साई समाधीचे दर्शन घेतले तसेच काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळेंचीही भेट घेतली.
मतदारसंघात असताना विखे नेहमी साई दर्शनासाठी शिर्डीला जातात. मात्र, यावेळी ते साई दर्शनासाठी थेट मुंबईहून शिर्डीला अचानक आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे भाजपवासी झाले. नगर दक्षिण लोकसभेसाठी भाजपने सुजयचे तिकीटही जाहीर केले आहे. सुजयच्या प्रवेशाने काँग्रेसमधील वातावरण तापले आहे. बाळासाहेब थोरात यांनी विखेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला असून, पक्षांतर्गत कलह वाढत चालला आहे. या सर्व घडामोडी बघता विखेंनी नवीन राजकीय निर्णय घेण्यापूर्वी साईंचे आशीर्वाद तर घेतले नाही ना? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. मात्र, याबाबत विखेंनी काहीही बोलण्यास नकार देत मौन बाळगले आहे.
शिर्डीत आल्यानंतर शिर्डी लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी विखे यांची भेट घेतली. कांबळे हे विखे समर्थक आहेत. मात्र, सुजयच्या भाजप प्रवेशावरून काँग्रेसमध्ये वातावरण तापले आहे. कांबळे हे विखे पाटलांच्या भुमिकेमुळे अस्वस्थ आहेत. विखे पाटलांची साथ मिळाली तर निवडणुक सोपी जाईल, असे त्यांना वाटत असल्याने त्यांनी विखे यांची भेट घेतली. हॉटेल सन अँड सम येथे बंद खोलीत विखे आणि कांबळे यांची १ तास चर्चा केली. या भेटीनंतरही कांबळेंना अद्याप काही ठोस आश्वासन मिळाले नसल्याने ते संभ्रमात आहेत. विखेंनी लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला असून ते लवकरच प्रचार सुरू करतील, असा आशावाद कांबळेंनी यावेळी व्यक्त केला.