मुंबई - राज्यामध्ये काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास शेतकऱयांना सरसकट कर्जमाफी करण्यात येईल, अशी ग्वाही विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहता तालुक्यातील अश्विवी दाढ बु. येथे दिली. या गावात सुमारे १ कोटी ९३ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आणि तलाठी कार्यालयाचे उद्धाटन विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
'शासन आपल्या दारी' या उपक्रमातून मंजूर झालेल्या रेशनकार्डचे वितरणही या कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी तालुक्यात १२ हजार रेशनकार्डाचे वाटप करणारा राहता तालुका हा जिल्ह्यातील पहिला तालुका असून ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनही ७० लाख रुपयांची कामे एका वर्षात पूर्ण केले असल्याचे विखे पाटलांनी नमूद केले.
यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले, की सध्याच्या सरकारकडून केवळ आश्वासने मिळाली. सत्तेवर येताच सातबारा कोरा करु म्हणणारे सत्तेवर येताच बदलले. काँग्रेस पक्षाने राज्यात जनसंघर्ष यात्रा काढल्याने दबावामुळे सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. मात्र, कर्जमाफी योजनेचा कोणालाही लाभ झाला नाही. राज्यात काँग्रेस सरकार आल्यास शेतकिऱयांना सरसकट कर्जमाफी देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
मोदी सरकारवर टीका करताना विखे पाटील म्हणाले, की या सरकारच्या धोरणांमुळे बेरोजगारी वाढली आहे. याविरोधात संघटीतपणे आता सामना करावा लागेल. या सरकारच्या कोणत्याही धोरणांचा लाभ सामान्य माणसाला झालेला नाही. या सरकारच्या विरोधात आता लोकशाही मार्गानेच आपल्याला न्याय मिळवावा लागेल, असे त्यांनी सुचित केले.
माजी सभापती सुभाष गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास कारखान्याचे व्हा. चेअरमन कैलासराव तांबे, संचालक प्रतापराव तांबे, मुळा प्रवराचे संचालक देवीचंद तांबे, संचालक अशोकराव गाडेकर, माजी सभापती मच्छिंद्र थेटे, जि.प सदस्य दिनेश बर्डे, पंचायत समिती सदस्या नंदाताई तांबे, सरपंच पुनम तांबे, माजी जि. प. सदस्य श्रावणराव वाघमारे, गोरक्षनाथ तांबे, प्रल्हाद बनसोडे, विजय तांबे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.