मुंबई- कोरोना प्रतिबंधासाठी अहमदनगर जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज (दि. 20 मे) देशातील निवडक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्याशी दूरदृश्यप्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्स) थेट संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी, जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशाची यशस्वी अंमलबजावणी, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची व्यापक अंमलबजावणी आदींची माहिती पंतप्रधानांना दिली. त्यावेळी त्यांनीही समाधान व्यक्त केले.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि त्याची अंमलबजावणी यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी पंतप्रधान मोदी यांनी थेट संवाद साधला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी तसेच मुंबईहून मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे तसेच वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. विविध राज्यातील निवडक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यावेळी सहभागी झाले होते. यावेळी अहमदनगर जिल्हा मुख्यालयातून जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके, सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.
उपाययोजनांची घेतली माहिती
जिल्हा प्रशासन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करत असलेल्या उपाययोजनांची माहिती पंतप्रधानांना दिली. रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न, जिल्हा प्रशासनासह पोलीस, आरोग्य, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद तसेच इतर सर्व यंत्रणांच्या सहकार्य आणि समन्वयाने राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, जिल्ह्यातील कोरोनाच्या पहिल्या लाटेत केलेले प्रयत्न आणि दुसरी लाट थोपविण्यासाठी केलेल्या उपाययोजना आदींची माहिती जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिली.
ग्रामपातळीवर यंत्रणा कार्यरत
केंद्र आणि राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशांची आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी, ब्रेक दी चैन आदेशानुसार दैनंदिन जीवन विस्कळीत न होता बाधितांना शोधण्याची मोहिम याची माहिती डॉ. भोसले यांनी दिली. कोरोना चाचणी, लसीकरण, खासगी डॉक्टर, रुग्णालयांकडून आकारले जाणारे शुल्क रुग्णांना परत करण्यासाठी अशा विविध बाबींसाठी नोडल अधिकारी नेमल्याने कामात गती आली. त्याचा सकारात्मक परिणाम यंत्रणेवर झाला. ग्रामपातळीवरील यंत्रणा कार्यरत झाल्याचे ते म्हणाले.
ऑक्सीजन उपलब्धता
जिल्ह्यातील ऑक्सीजन निर्मिती करणारे प्लान्ट, बाहेरुन आणण्यात येणारा ऑक्सिजन सुरक्षितरित्या पोहोचावा यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत केली. प्रत्येक ऑक्सिजन प्लान्टवर स्वतंत्र उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी समन्वय अधिकारी म्हणून नेमला. खासगी रुग्णालयाकडून ऑक्सिजनची मागणी नोंदवून तेथील रुग्णसंख्येप्रमाणे त्यांना ऑक्सिजन पुरवठा करण्यात येऊ लागल्याने उपलब्ध ऑक्सिजन व मागणी हे बर्यापैकी स्थिर करण्यात प्रशासनाला यश आले. राज्य शासनाच्या ऑक्सिजन निर्मिती प्लान्टसाठी प्रोत्साहन देण्याच्या धोरणाची वेगाने अंमलबजावणी करुन जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती प्लान्टची उभारणी सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी पंतप्रधान मोदी यांना सांगितले.