शिर्डी (अहमदनगर) :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा शनिशिंगणापूर (Shani Shingnapur) दौरा 30 नोव्हेंबर रोजीचा निश्चित झाला आहे. त्यामुळं येथे कामांची लगबग सुरू झालीय. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, प्रांताधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार डॉ. संजय बिरादार भेटी देऊन पाहणी करत आहेत. केंद्र आणि राज्याची गुप्तचर यंत्रणा, सीआयडी, सुरक्षा यंत्रणा, अन्न आणि औषध प्रशासन, सार्वजनिक बांधकाम आणि देवस्थानचे सर्व विभाग दिवसरात्र नियोजन करत आहेत.
देवस्थानची संपूर्ण यंत्रणा लागली कामाला : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता शनिशिंगणापूर येथे येणार असून यावेळी संकल्प पूजा आणि शनिदेवाला तेलानं अभिषेक घालणार आहेत. शनिदेवाच्या दर्शनानंतर, शनिदेवाच्या प्रसादाचा देखील लाभ घेणार आहेत. जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रपती दर्शनानंतर भोजन करणार असल्यानं येथील तीन मजली इमारत आणि त्यातील सर्व सूट सजवण्यात आल्या आहेत. प्रशासनाने सूचना केल्याप्रमाणे मंदिर परिसर, मुख्य रस्ता, राष्ट्रपती थांबणार असलेल्या ठिकाणी आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत. याकरता देवस्थानची संपूर्ण यंत्रणा दिवसरात्र काम करत आहे, असं शनैश्वर देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी सांगितलं.